Sunday, July 29, 2018

हिंदी

छोट्या अदितीला शाळेत चार भाषाविषय आहेत हे कळल्यावर माझा तिच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला. तिच्या वयाचे असताना आम्हाला फक्त मराठी शिकवायचे, पण आम्हाला छडीची भाषाच अधिक चांगली समजायची. टिफीन घेऊन जावं एवढ्या सहजतेने आम्ही आपआपली छडी सोबत घेऊन जात असू, गुरुजी एखाद्याला झोडपताना त्यांची छडी मोडलीच तर पटकन हाताशी दुसरी असावी म्हणून. 
पुढे अर्थातच भाषा वाढल्या. मराठी मातृभाषा असल्याने आय वोज नोट मच वरीड अबाउट इट. चांगले टीचर्स लाभल्याने, आणि इंग्रजी पुस्तकांच्या आणि मुख्य म्हणजे चित्रपटांच्या परिशीलनाने तो पाया पक्का झाला होता. वांधे होते ते हिंदीचे.
एकतर गोव्यात हिंदीशी फारसा संपर्क येत नाही. आम्ही गोवेकर सरळ कोकणीत सुरुवात करतो, आणि त्याचा उपयोग झाला नाही तर निव्वळ हातवाऱ्यांवर पूर्ण संभाषण निभावून नेतो. पुढे पुण्यात असताना माझे मित्रमंडळ पण देशपांडे, खुले, बापट वगैरे असल्याने हिंदीचा उपयोग मर्यादितच होता. अधूनमधून पीएमटी बसेसमध्ये मी "थोडा बाजूला सरकके बसो की भैय्या" वगैरे बोलून हिंदीला धार काढून ठेवत असे.
मात्र हिंदीशी खरी मुंहभेट झाली ती नागपुरात. इकडे सगळेजण डायरेक हिंदीत सुरू होऊन जातात. बरं, हिंदी पण अशी की म्हटलं तर हिंदी म्हटलं तर मराठी. माझ्या ऑफिस कलीगने पहिल्याच दिवशी "आज जलदी घरी जाताना पडता भाई, आकाशात बादल येऊन राहिलेत" असं म्हटल्यावर मला भयंकर आनंद झाला, आणि तेव्हापासून मी जे हिंदीत तोंड सोडलंय ते आजतागायत.
फक्त एकदा ऑफिसमध्ये लंच जास्त झाल्यानं "पेट में गोला आया हय" असं म्हटलं तेव्हा, आणि एकदा बराच वेळ एका जागी बसून काम केल्यानं "अब मेरे पाव भारी हो रहे हय" असं म्हटलं तेव्हा, मुली का हसून राहिल्या ते मात्र समजलं नाहीये.

Sunday, July 22, 2018

काम....

"Work" आणि "Sex" साठी मराठीत "काम" हा एकच शब्द ज्याने योजिला त्याचा पुण्यातील (पाण्यात न बुडालेल्या) भिडे पुलावर, नागपूरची अस्सल संत्रा बर्फी आणि मुंबईचा वडा पाव देऊन सत्कार केला पाहिजे. या शब्दांनी माझ्या चिमुकल्या बालमनात किती गोंधळ घातला होता ते सांगणं कठीण आहे. (बा द वे, "चिमुकलं बालमन दुखावलं गेलं" हे वाक्य अनेक ठिकाणी वाचायला मिळायचं आणि लहानपणी खेळत असताना नेहमीच कोपर फोडून घेतल्यानं बालमन कोपरात असतं असं वाटायचं.)
तर काम.... कामक्रीडा म्हणजे दिवसभराचा कामाचा व्याप संपल्यावर खेळणं असं मला वाटत असे. कामचोर म्हणजे चोरून भलतेच पिक्चर पाहणारा असा माझा ग्रह होता. संस्कृतच्या गुरुजींनी "कामातूराणां न भयं न लज्जा" याचा अर्थ विचारल्यावर मी 'जो भरपूर काम करतो त्याला कोणाची भीती नसते' असे सांगितल्यावर गुरुजींनी पाठीत शाबासकीऐवजी धपाटा का घातला आणि दुसऱ्या दिवसापासून मी मराठी वर्गात का बसू लागलो हे मला आजतागायत समजलं नाही.
'चार पुरुषार्थापैकी काम एक आहे', हे वाचून भरपूर अंगमेहनत करावी असे मी ठरवेपर्यंत 'काम हा सहा षड्रिपुंपैकी एक आहे' असे वाचून बुचकळ्यात पडत असे. "माझं तुमच्याकडे काम आहे" अथवा "एक काम कराल का" अथवा "आपण कामाचं बोलूया" असे म्हटल्यावर समोरच्याने त्याचा भलताच अर्थ घेतला तर, याचं मला टेंक्शन यायचं.
नंतर मी मोठा झालो. काही गोष्टी रात्रीचा दिवस करून आत्मसात केल्या... तर काही मित्रांनी समजावल्या, आणि आपण कामाचा उगाचच बाऊ करत होतो असे लक्षात आले.