Monday, May 27, 2024

पुणेरी लग्न​!

 "पुण्यात काय पहावं?" असा प्रश्न विचारला तर 'शनिवारवाडा' ते 'शनीपार' अशा रेंजमध्ये काहीही उत्तरे येऊ शकतात. माझे काही जुने (व आता जाणते झालेले) मित्र "दिवसा फर्ग्युसन व रात्री कॅम्प" असं सांगतात व स्वानुभवाने ते पटलंय पण.

पण... पुण्यात आवर्जून अनुभवावी अशी एक गोष्ट म्हणजे - इथे होणारी लग्नं. 

हल्लीचीच गोष्ट. ऑफिस कलीगचं लग्न ठरलं. त्याच्या आयुष्यातील हा पहिलावहिला रोमहर्षक प्रसंग असल्याने त्याने अगदी निवडक व जिवलग अश्या ५०-६० जणांनाच निमंत्रण दिले व वरून "दिवसभर नुसतं वडापाव मिरच्या चरत असता लेको, लग्नात खास मठ्ठा ठेवलाय, प्या हवा तेव्हढा!" असं अगदी लाडाने सांगितलं.

मी आणि अमित सोबत जाणार होतो पण आयत्या वेळी अम्याने शेंडी लावली. ("आमरसासारखा जुलाब होतोय रे मित्रा, आताही तिकडूनच फोनवर बोलतोय. विश्वास नाही बसत, तर येऊन ब-") मी फोन बंद केला.

तर मी लग्नस्थळी पोचलो आणि शेवटच्या रांगेतील खुर्ची पकडून, परमेश्वराने मोठया कुशलतेने घडवलेल्या मनमोहक कलाकृती बघण्यात गर्क झालो. 

तेवढ्यात - 

"कुणीकडून आलात?"

मी वळून पाहिले तर एक आजोबा माझ्या बाजूच्या खुर्चीत प्रकट झाले होते. बहुदा त्यांचा नातू त्यांना वाऱ्यावर सोडून सामाजिक बांधिलकी दृढ करण्यात गुंतला असावा.

"कोथरूडहून आलो", म्या वदलो.

"अरे, कुणीकडून म्हणजे मुलाकडून की मुलीकडून?"

"मुलाकडून", मी ओशाळून म्हणालो.

"हम्म..." असं म्हणून ते मला वरून खालपर्यंत न्याहाळू लागले. बहुदा ते मुलीकडून असावेत.

" नाव काय?"

"गौतम", मी अनावश्यक माहिती देण्याच्या विरुद्ध आहे.

"आडनाव?" आजोबा बहुदा पत्रकार होते.

"सोमण".

"हम्म..."  पुन्हा न्याहाळणे सुरु. मी आपलं, मुली जसं ओढणी, पदर वगैरे सावरतात, तसे काहीसे अंगविक्षेप केले.

 "नवऱ्यामुलाशी काय नातं?"

"आम्ही दोघं एकाच कंपनीत काम करतो"

"काय काम करता?"

"संगणक प्रोग्रामर आहोत!" मी छाती पुढे काढून सांगितले. (एखाद्या ललनेने ऐकलं असावं का!?)

"हॅह, तुम्हां IT वाल्यांचा गल्लोगल्ली सुळसुळाट झालाय आहे नुसता" आजोबा करवादले. मला एकदम आम्ही सगळे उंदरांसारख्या मिश्या फुटून आपापल्या बिळात लॅपटॉप बडवत असल्यासारखे वाटू लागले. 

आजोबांचा पिच्छा सुटावा म्हणून मी रिकाम्या खुर्च्या शोधू लागलो. पण हॉल पूर्ण भरला होता. पुण्यात बहुदा २०० लोकं निमंत्रित असतील तर ५० आसनक्षमतेचाच हॉल बुक करत असावेत - सगळे लोक काय एकदम थोडी येतात? आणि आले तर घेतील ऍडजस्ट करून आपसांत! दोनच खुर्च्या रिकाम्या होत्या  - त्या म्हणजे स्टेजवरच्या राजा राणी खुर्च्या.  नवरा नवरी फ्रेश व्हायला (अम्याच्या भाषेत "कापडं बदलायला") गेले असावेत. 

मी तिथेही जाऊन बसलो असतो इतके इकडे आजोबा सुसाट सुटले होते. मी मग जीवावर उदार होऊन वाटेल ते बेधडक सांगत सुटलो... पण अचानक जेव्हा त्यांनी अगदी मर्मावर बोट ठेवले -

"पगार कितीसा असतो?" 

तेव्हा मात्र माझा आटा ढिला झाला.

"फार काही नसतो आजोबा...  रोजच्या चार विड्या आणि अधूनमधून एखादी हातभट्टीची चपटी यांचा खर्च सुटतो, बास होतं."

आजोबांची दातखिळी बसली असावी. त्याच संधीचा फायदा घेऊन मी तिथून अंतर्धान पावलो.

(२००७)