Tuesday, November 29, 2011

पं.संजीव अभ्यंकर - एक सुरेल संजीवन स्वरयात्री



पयले छूट सांगून टाकतो कि मला शास्त्रीय संगीतातील ओ कि ठो कळत नाही. तुम्ही समोर बसून एखादी चीज गाऊन रायलात तर तो राग आहे कि रागिणी आहे कि ख्याल आहे कि बंदीश आहे कि खरोखरच एखादी ’चीज’ आहे हे काही आपल्याला ऊमजून नाय बा येनार.


पन म्या म्हन्तो, कि आता आपल्या देशात ती शिंची लोक्शाही  की काय म्हन्तात ती हाय नव्हं, मंग एकाद्या ईषयातलं आपल्याला समजो न ऊमजो, मत ठेऊनशान देनं म्हत्वाचं, कसं?


तर, पं. संजीव अभ्यंकर या नावाची पहिली ऒळख झाली ती मुक्कम पोष्ट Edinburgh ( उच्चारी एडिनबर्घ अथवा एडिम्बर्घ अथवा एडिम्ब्रा!), मौजे Scotland येथे. दिवसभर हापिसात विंग्रजी फाडल्यावर ("अरे बाबा,  I was telling you  ना कि  it is a bug? आता बघ!") आणि घरी हिंदीच्या चिंध्या केल्यावर ("झिशानभाई, बटाटा बारीक बारीक कापना बरं का! कलके जैसा मोठे-मोठे टुकडे मत कापना, वरना वो गळे मे अडकते हय!") कानावर काहीतरी ’चांगलं’ पडावं अशी आस लागल्यास नवल नव्हतं!


महाजालावर भटकत असताना YouTube वर एक गाणे भेटले. गाण्याचे सूर, शब्द, भाव, अर्थ व या सगळ्यांइतकाच, किंबहुना त्यापेक्षाही महत्वाचा म्हणजे गायकाचा मधाळ आवाज, या सर्वांची अशी काही मोहीनी पडली कि बस्स!.


मग काय, संजीव अभ्यंकर हे नाव गूग्लायचा छंदच लागला. कधी YouTube कधी Raagaa.com अशी एक सुरेल शोधयात्रा सुरू झाली.



अरे हो, सांगायचे राहिलेच -- गाणे होते मालकंस रागातले "पिया संग लड पछतानी रे"


अगदी लहान वयातच संजीवजींची शास्त्रीय गायनातील रुची पाहून आई शोभा अभ्यंकर (ज्या स्वत: मेवाती घराण्याच्या गायिका आहेत) यांनी पं. जसराज यांना संजीवला शिष्य म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. एखादा कुशल जवाहीर ज्याप्रमाणे रत्नाची पारख करतो त्याप्रमाणेच पंडीतजींनी संजीवचे गायन ऐकूनच त्याला स्वीकारले. प्रत्यक्ष स्वर-भास्कर जसराज यांच्याकडून त्यांनी तब्बल १० वर्षे गुरूकुल पध्दतीने गाण्याचे शिक्षण घेतले.


संजीवजींच्या गाण्यात मला सर्वांत आवडणार्या गोष्टी दोन.

पहिली म्हणजे स्वरांतील गोडवा. सूर कितीही टिपेला लागला असला तरी तो अतिशय गोड वाटतो.

दुसरी गोष्ट म्हणजे शास्त्रीय संगीत अतिशय रूढीप्रिय मानले जात असूनही संजीवजी त्यात अनेक अभिनव प्रयोग करत असतात.  ’जसरंगी" जुगलबंदी म्हणजे दोन गायकांनी एका प्रकृतिस्वभावाचे पण दोन भिन्न राग एका वेळी गाणे ( अश्विनी भिडे-देशपांडे यांच्यासोबत), व्हायोलिन आणि गायन यांची जुगलबंदी, हिंदुस्थानी शास्त्रीय गायन आणि कार्नाटिक संगीत Carnatic music (शंकर महादेवनबरोबर), असे अनेक प्रयोग त्यांनी केले आहेत.


पं. संजीव अभ्यंकर यांची अनेक गाणी (शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग) माझ्या संग्रही असली तरी अजून प्रत्यक्ष मैफिलीत त्यांना ऐकण्याचा योग अजून आला नाही. कधी जमते पाहू.


लेख संपविण्यापूर्वी, माझी काही आवडती गाणी:

ए री आली पिया बिन हे गाणे...
तर, अश्या या अलौकिक स्वराचा आनंद सध्या आम्ही घेत आहोत, तुम्हीही घ्यावा.


वरतारीख( अर्थात Update!):
पं. संजीव अभ्यंकर यांच्यावरचा एक अभिप्राय (कोणाचा ते विचारू नका! बंदे को जीव प्यारा हय!): "अय्या! कित्ती गोsssड smile आहे नाई! आणि dimples पण आहे वाटतं!"


कोणाला कशात काय आवडेल काही सांगता येत नाही. तुम्ही बघा, तुम्हाला काय भावतं ते!

No comments: