Tuesday, May 4, 2010

मुलं आणि मारामारी

काही दिवसांपुर्वीची गोष्ट... रस्त्याने चाललो होतो. बाजूनं काही शाळकरी मुलं जात होती. त्यातील दोघांची नुकतीच मारामारी झाली असावी, कारण कपडे मातीने माखलेले होते, हाता-पायांवर खरचटल्याच्या खुणा ठळक दिसत होत्या. महत्त्वाचे म्हणजे रस्त्याने जाताना पण त्यांची जोरजोरात बाचाबाची चालू होती. विषय अर्थातच IPL मधील Mumbai Indians चा पराभव व सचिन तेंडुलकरची कर्णधार म्हणून क्षमता. आता, सचिन तेंडुलकरचा विषय निघाला कि थोर-थोर लोक सुद्धा हमरी तुमरीवर येतात, तिथे पोरांमध्ये मारामारी व्हावी यात नवल नव्हते.

शाळेत असताना मारामारी हा रोजच्या विषयांपैकी एक असावा असे वाटण्य़ाइतपत परिस्थिती होती. माझे काही परम-मित्र तर शिकण्यापेक्षा भांडायलाच शाळेत येत असावेत. भांडायला कारण काही लागायचे नाही. तुला माझ्यापेक्षा जास्त मार्क का मिळाले, इथपासून ते, तू माझ्याकडे रोखून का पाहिलेस, या पैकी कशावरूनही युद्ध पेटायचे.




सुरवात साधारणपणे आम्ही प्रार्थना (Assembly) संपवून वर्गात परतत असताना धक्कबुक्की करणे, In केलेला शर्ट बाहेर ओढून काढणे इथून करत. मग दिवसभर वर्गात कागदी बोळे फ़ेकून मारणे, पेन्सिलीचे टोक मोडणे, Camlin च्या पट्ट्या (Ruler) मोडणे असा गनिमी कावा चालून शेवटी सांगता  शाळेच्या क्रीडांगणावर वर्ग-बंधूंच्या ( आणि काही भगिनींच्या) साक्षीने तुफ़ान हाणामारीने व्हायची. एकमेकांना (आणि काही बघ्यांना) व्यवस्थित चोप दिल्यावर भिडू "आजचा दिवस सत्कारणी लागला" या समाधानात आप-आपल्या घरी जात.




काही येरूंच्या तोंडी मात्र "हात लावलास तर याद राख" "उद्या बघून घेईन" अशी - केवळ भारताच्या संरक्षण-मंत्र्यांच्या तोंडीच शोभणारी - भाषा असायची; तर काही शूरवीर "बाबांना नाव सांगीन" "टिचरला कंप्लेन करीन" वगैरे धमक्या द्यायचे. यदाकदाचित हे लोक पुढे भारताचे पंतप्रधान वगैरे झालेच तर "अमेरिकेला नाव सांगीन हं" वगैरे बाता करायला त्यांना हा अनुभव कामी येईल. असो!

आजकाल भांडण करणे, हा प्रकार मुलांमध्ये थोडा कमीच होत चालला आहे असे वाटते. कारण आई-बाप (म्हणजे पालक लोक) "जागरूक" झाले आहेत. पोराला कोणी बोट जरी लावले असेल तरी पहिला फोन त्या "गुंड" मुलाच्या घरी जातो, आणि दुसरा शाळेच्या प्रिन्सिपलना. इकडे मुलं आपलं भांडण विसरून मजेत खेळत असतात अन तिकडे दोन्ही पालक एकमेकांची ऊणीदुणी काढत रहातात.


मला स्वत:ला मारामारी न करणारे बालक, आणि मारामारी करणारे पालक.. दोन्ही पण मुळीच आवडत नाहीत!

3 comments:

Maithili said...

Mastach....
Kharey.. bhandayache nahi mag shalet kashala jayache asa aamachahi attitude hotaa...
Lckly aamachya bhandanaat aamache aai - baba kadhich padale naahit karan aamachya angavarachya maramarichyaa khuna mitanya aadhich aamhi parat ekatr hoto he tyana mahiti asayache....

शांतीसुधा (Shantisudha) said...

छान गौतम. मस्त वाटलं तू परत ब्लॉग वर लिहायला सुरूवात केलीस त्याचं. अभिनंदन. आम्हाला असेच छान छान लेख वाचायला मिळू देत.

शाळेतील भांडणे मस्तच विषय आहे. खरंय आजकाल मुलं फक्त टिव्ही किंवा व्हिडीओ गेम मध्ये डोकं खुपसून बसतात नाहीतर शाळेत असले म्हणजे वर्क बुकं आणि चाचण्या यांच्या ओझ्या खाली. त्यांना भांडायला वेळच मिळत नसेल.
त्यामुळे लहन मुलांनी भांडायचं सोडून मोठेच भांडण करत बसतात.

GD said...

फार आवडल बरका!
मी पण भरपूर मारा-मारी केली आहे. कधी कधी तर अजूनाही काही लोकांशी कराविशी वाटते. :) Keep Writing!

-Geetanjali