रोजच्या जगण्यात (साहित्तिक भाषेत लिवायचं म्हंजी ’दैनंदिन जीवनात’) आपण अनेक रुढी-प्रथांना कवटाळून रहातो. त्यापैकी काही प्रथांची तार्किक कारणं सांगू शकतो, तर काही प्रथा अनाकलनीय वाटतात.
या लेखात मी अशाच काही समज-गैरसमजांचा संग्रह करणार आहे.
समज -गैरसमज...
साय़ंकाळी दिवा लावल्यावर हात-पाय धुवू नयेत, तसेच केर-कचरा काढू नये.
पुर्वी दिवेलागणीच्या वेळेला परवचा-पाढे म्हणत. या प्रथेमुळे मुले-बाळे मोठी माणसं आपोआप घरी लवकर परतत. सर्वजण मिळून स्तोत्रे म्हणत, एकत्र जेवण करत. तसेच आधी tubelights वगैरे नसल्यामुळे केर वगैरे काढला तर घरातील काही महत्त्वाची वस्तू बाहेर जाण्याची शक्यता असायची.
आजच्या काळात हे सर्व शक्य नसले तरी या प्रथेचे स्पष्टीकरण देता येते.
मांजर आडवं गेलं तर काम होत नाही. मांजरांनी काय गुनाव केला वो? कुत्र्या-मांजरांसारख्या निष्पाप प्राण्यांपेक्षा (काही) माणसं आडवी गेली तर तो अपशकून ठरतो.
शुक्रवारी पैसे देऊ नयेत, द्यायचेच असतील तर मंगळवारी द्यावेत. शुक्रवार देवीचा (लक्ष्मीचा) वार, म्हणून पैसे देऊ नयेत हे पटण्याजोगे आहे; पण मंगळवारी पैसे का द्यावेत हे माहीत नाय बा...
एखाद्याला बाहेर जाताना ’कुठे जातोस" असे विचारू नये, त्याने काम होत नाही. साक्षात समर्थ उत्तम लक्षण सांगताना लिहून गेलेत की "जाणारास पुसो नये कोठे जातोस म्हणोनी". एकदम बरोबर... अनेकदा आपल्याला सांगायचं नसतं. मग चिडचिड होते, काही तरी थातूरमातूर कारणं द्यावी/ऐकावी लागतात. त्यापेक्षा न विचारलेलं बरं!
एखाद्याला घरी यायला ऊशीर होत असेल तर, दाराला पळी (संध्येत वापरतात ती, आमटीत बुडवतात ती नव्हे ) अडकवावी, म्हणजे माणूस लवकर घरी परत येतं. असं एक-दोनदा झालंय... म्हणजे होतं कसं की फ़ारच वाट पहायला लागली की शेवटी वैतागून आपण पळी अडकवायला आणि दाराची बेल वाजयला एकच गाठ पडते. पण हा निव्वळ योगायोग असावा.
केळं अर्धवट खाऊन टाकू नये; तसंच दहीभात पानात टाकू नये. कारण केळ्याला ब्रह्मफ़ळ मानतात व दहीभाताला पुर्णान्न... काही ठावकी नाय बुवा, पण केळं काय किंवा दहीभात काय, पानात काहीच टाकू नये हे बरं!
गणेश चतुर्थीला चंद्र पाहील्यास चोरीचा आळ येतो... जसा श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला होता (बाकी, कृष्णदेवांवर कोणता आळ यायचा बाकी होता!).
पण लहानपणी रात्री घरोघरच्या धुपारत्या आटपून पायवाटेने येत असता चंद्राचाच प्रकाश कामी यायचा आणि हटकून नजर जायची! तेव्हा, ही फ़क्त एक पुराणकथाच असावी.
खिडकीबाहेर कावळा ओरडला की घरी पाहुणे येतात... धादांत असत्य! कावळा ओरडो अथवा न ओरडो, पाहुणे लोक यायचे तेव्हाच येतात (आणि त्यांना जायचे तेव्हाच जातात).
मुंगूसाचे दर्शन शुभ असते... मी रहातो तिथे अनेकदा मुंगूस दिसते. त्या दिवशी विशेष असं काही घडल्याचं स्मरत नाही (हां, कधी कधी टिफ़ीनमध्ये बटाटयाची भाजी निघते हे खरंय!), तरी मुंगूसाची ती झुपकेदार शेपटी बघण्यातही आनंद असतो.
... आणि काही यक्ष-प्रश्न!
दैनंदिन जीवनात (च्यामारी!) काही प्रश्न असे असतात, जरा ऊवांसारखे... म्हटलं तर क्षुल्लक, म्हटलं तर डोकं खाजवायला लावणारे. त्यांचा (प्रश्नांचा.. ऊवांचा नव्हे!) समावेश मी या भागात करणार आहे. (अर्थात या शंका-कुशंकाना यक्ष-प्रश्न वगैरे म्हणणे म्हणजे, बाभुळगावच्या बबन्याने स्वत:ला बिल गेट्स समजण्यासारखेच आहे... पण ते एक असो!)
माणसं मंदिरात प्रदक्षिणा काढताना, देवाच्या मागं जाऊन डोकं का बरं टेकवतात? असं डोकं टेकवत राहिल्याने तिथे खोलगट भाग तयार होतो, डोस्क्यांचं तेल लागून जागा ओलसर होते, आणि मग माणसं तिथे नाणी चिकटवतात!
माणसं जांभई देताना चुटक्या का वाजवतात? माश्या वगैरे तोंडात जाऊ नये म्हणावं तर इतर वेळी हीच लोकं तोंड मोकळं सोडून बोलत असतात.
[ समज-गैरसमज आणि प्रश्न... संपलेले नाहीत! जसजसे आठवत जातील तसतसे लिहीत जाईन..]
8 comments:
paravacha mhanaje kaay ?
वा छान समज गैरसमज दूर केलेत!
अजुन येऊ द्या.
माझा एक मित्र मांजर आंडवे गेले की सात पावले मागे जात असे.
आमच्या घरी यायला लागल्यावर त्याची ही सवय आपोआप सुटली.
कारण आमच्याघरी त्या काळात ७-८ मांजरे होती. कुठल्याही वेळेस
एक-दोन आडवी जायची :)
khup sahi aahe!!!!
too good..!!!mast aahe ekdum.. :)
mitra tuza lekh me eka marthi forum site var copy kely pan tuze naav mahi nahi mag to mazya navane lihilay see at http://www.forumchat.in/forum/index.php?id=93&page=1 visit http://marathichat.in for best chat with marathi users
Gautam, Mast!! really liked your blogs :)
ekach number gairsamaj dur jhale
Post a Comment