Monday, July 8, 2024

नावात काय आहे?

 व्यक्तिंमुळे नावं नावारूपाला येतात की नावामुळे व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडते हा प्रश्न मला आदिम काळापासून म्हणजे गेल्या सात महिन्यांपासून पडत आला आहे. यासंदर्भातील माझ्या काही नोंदी इथे शेअर करत आहे. 

वैधानिक इशारा - This post is based on an extremely limited dataset. It is not directed towards any particular person and is not intended to be derisive, offensive or abusive. Take it in the same lighter vein as it is meant to be.


मुलांच्या  नावाचा शेवट सर्वसाधारणपणे अ-कारांत असतो  तर मुलींचां आ अथवा ई. अर्थातच अपवाद दोन्हींकडे आहेतच.

  •  अभिजित नावाच्या व्यक्ती हँडसम आणि स्मार्ट असतात. 
  • अमित हे बहुतेक वेळा खोडकर आणि ज्याला आपण मराठीत शरारती म्हणतो तसे असतात. तसेच, ज्याप्रमाणे प्रत्येक कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये एकतरी देशपांडे नाव असतंच त्याप्रमाणे एकतरी अमित असतोच (आणि बऱ्याचदा तो अमित देशपांडेच असतो).
  • हृषिकेश यांच्याकडे एखादी कला नक्कीच असते (गायन, वादन, चित्रकला, वगैरे!). तसेच ते संतुलित प्रवृत्तीचे असतात. म्हणजे त्यांचे दोस्तलोक एखाद्याला  तुडवत असतील तर "जाऊ द्या रे, सोडा त्याला" म्हणणारे असतात.
  • अक्षय नावाची मुलं जगन्मित्र असतात, मित्रपरीवार मोठा असतो.
  • महेश आपल्या नावाला जागून गंभीर प्रवृत्तीचे असतात. कधी विनोद केला तरी तो बाष्कळ स्वरूपाचा नसतो.
  • गिरीश बहुतांश ऊंचेपुरे अथवा हाडपेराने मजबूत असतात. 
  •  मंदार नावाचे लोकं स्वभावतः हसतमुख असतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक निर्व्याज हसू असते. 
  • श्रीनिवास अथवा व्यंकटेश नावाची लोकं धार्मिक प्रवृत्तीची, नाम लावणारी आढळतात. त्या नामाचा महिमाच तसा असावा.
  • गणेश, विष्णू, शंकर, लक्ष्मी ही नावं त्यांच्या मूळ रूपात सर्रास वापरली जातात. तसा प्यूअर "इंद्र" कुठे दिसत नसला तरी रवींद्र, देवेंद्र, शैलेन्द्र, इत्यादी रूपात तो असतो.
  • सविता हे नांव मुलींना ठेवत असले तरी वस्तुतः ते सूर्याचे नाव आहे. तसेच, सूर्याचे "भास्कर" हे नांव मला फार आवडते पण आजकाल फारसे आढळून येत नाही.

आणि हा केवळ इतरांना नावं ठेवून राहिलाय असं नको म्हणून - 

  • गौतम नावाचे लोकं impatient आणि तापट स्वभावाचे असतात (पण पुढे या दोन्ही गोष्टी बऱ्याच प्रमाणात कमी होत जातात हे ही तितकेच खरे). 

सध्या इतकेच पुरे... अर्थात अस्मादिकानी मुलींच्या नावांचा आणि त्याच्याशी निगडीत स्वभावविशेषांचा याहून अधिक प्रदीर्घ आणि प्रगाढ अभ्यास केला आहेच हे चतुर वाचकांच्या, et cetera. ते नंतर कधीतरी पाहू.


Friday, June 28, 2024

फ़ोन नम्बर्स

 IT क्षेत्रात काम करणारे येरू हे सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग, हार्डवेअर मेंटेनन्स, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अश्या सगळ्याच परीक्षा पास झालेले असतात असा एक सार्वत्रिक गैरसमज असावा. त्यात हे टोणगे शनिवार-रविवार घरी रिकामटेकडे बसलेले कोणालाच बघवत नाही. 

हल्लीचीच गोष्ट. पाहुणे आले होते. गप्पा चालू होत्या. म्हणजे घरचे बाकी लोकं बोलत होते व मी मखरात बसल्यासारखा फिक्स बसलो होतो. अचानक ते काका माझ्याकडे वळून म्हणाले, "मला एका डॉक्टरांचा फोन नंबर मोबाईलमध्ये सेव्ह केलेला आहे तो सापडत नाहिये. शोधून द्या बरं. तुम्हां IT वाल्यांना ट्रिक्स माहीत असतीलच, हॅहॅहॅ "

 मी पण "हहह' करुन त्यांच्याकडून फोन घेतला. सर्व डिटेक्टीवांचा परात्पर गुरू शेरलॉक होम्सला वंदन केले व Contacts उघडले. 

सर्वसाधारणपणे आपण डॉक्टरांची नावं Doctor ABC अशी सेव्ह करतो अश्या कयासाने D मध्ये गेलो. तिथे Dr ने सुरु होणारे अनेक नंबर्स पाहून स्वतःलाच "है शाब्बास" म्हणालो. आता फक्त नेमका नंबर शोधायचा होता. लिस्ट चाळत होतो तर Dr Baban, Dr Pintya, Dr बाळू अशी नावं पाहून चक्रावलो... म्हटलं, असतील त्यांचे खास जिगरी.. 

तरी नंबर काही सापडेना म्हणून त्यांना म्हटलं की Dr लिस्टमध्ये तर दिसत नाहीये..

 तर ते पटकन म्हणाले, "अरे ते ड्रायव्हर्सचे नंबर्स आहेत. रेती, वाळू, सिमेंट वगैरे transport करायला लागतात." 

 माझ्या चेहऱ्यावरील बदलते भाव पाहून सौ. ने मला स्वयंपाकघरातून चहा घेऊन यायला सांगितले...

Mugdha Manerikar  यांची, त्यांनी त्यांच्या फोनमधून असेच चित्रविचित्र नंबर्स डिलीट केल्याची पोस्ट वाचून ही घटना आठवली! 

 परिशिष्ट 1: त्या डॉक्टरांचा नंबर सापडला - Hadaacha doctor या नावाने सेव्ह केलेला.

परिशिष्ट 2: मीही काही वेगळा नाही... इस्त्रीवाल्याला फोन करायचा असल्यास मी डायल करतो - Ironman


Tuesday, June 25, 2024

Dad Jokes

 इंग्रजी विनोदी साहित्यात Dad jokes नावाची एक कॅटेगरी आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर वडिलांनी आपल्या मुलांना उद्देशून अथवा अन्यत्र केलेले जोक्स. हे अतिशय पांचट असतात, इतके की जोक करणारा डॅड सोडून बाकी कोणीच हसत नसतं... आणि त्याच्या मुलांना, पत्नीला तर "कशाला हे ध्यान आपल्यासोबत आहे" असं होऊन जातं. 

Dad jokes ची एक दोन उदाहरणं द्यायची झाली तर - 

मुलगा बापाला म्हणतोय - hey Dad,  I am hungry.  तर बाप म्हणतो - hi Hungry, I am Dad.

वाईट आहे ना? हा दुसरा, त्याहून वाईट.

मुलगी बापाला सांगते - Dad, I need to leave early for office tomorrow, please call me a cab  at 7 am. 

बाप बरं म्हणतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता, बाप मुलीला - Hi baby, you are a cab.

म्हणजे एका टोकाला एकदम तरल, subtle असा ब्रिटिश ह्युमर आणि त्याच्या एकदम विरुध्द टोकाला हे dad jokes असं म्हणता येईल. 

X /Twitter वर जेम्स ब्रेकवेल याच्याकडे अश्या जोक्सचा भरपूर संग्रह आहे. मराठी फेसबुकविश्वात Abhijit A Pendharkar  व Anand Kashelkar  हे दोघे अधूनमधून dad jokes च्या पुड्या सोडत असतात त्या मला प्रचंड आवडतात.

माझ्या विनोदाचा स्तर तर दिवसेंदिवस खालावतच असतो. 

मी मागे एकदा पोरीला विचारलं की बेस्ट फ्रेंड कोण आहे? तर म्हणाली, युविका. मी म्हटलं, "अरे वा, जेव्हा ती भेटेल तेव्हा मी तिला विचारेन "तुझा फेव्हरीट क्रिकेटर कोण गं, युवी का?"

आता याहून अधिक वाईट जोक असणं शक्य नाही असं तुम्हाला वाटलं असेल तर... परवाचीच गोष्ट. मी व पोरगी अफगाणिस्तान विरुध्द ऑस्ट्रेलिया T20 वर्ल्ड कप मॅच बघत होतो. एका बॉलरला ऑसीजच्या विकेट्स घेताना पाहून ती म्हणाली, "बाबा, हा नवीन उल् हक एकदम खतरनाक बॉलर आहे हां, आपल्या टीमला डेंजर ठरू शकतो". मी तत्परतेने म्हणालो, " फिकर नॉट, बेटा. आपल्या टीमविरुध्द खेळायला येईपर्यंत जुना होऊन जाईल हा नवीन उल् हक, कोई शक?"


Monday, May 27, 2024

पुणेरी लग्न​!

 "पुण्यात काय पहावं?" असा प्रश्न विचारला तर 'शनिवारवाडा' ते 'शनीपार' अशा रेंजमध्ये काहीही उत्तरे येऊ शकतात. माझे काही जुने (व आता जाणते झालेले) मित्र "दिवसा फर्ग्युसन व रात्री कॅम्प" असं सांगतात व स्वानुभवाने ते पटलंय पण.

पण... पुण्यात आवर्जून अनुभवावी अशी एक गोष्ट म्हणजे - इथे होणारी लग्नं. 

हल्लीचीच गोष्ट. ऑफिस कलीगचं लग्न ठरलं. त्याच्या आयुष्यातील हा पहिलावहिला रोमहर्षक प्रसंग असल्याने त्याने अगदी निवडक व जिवलग अश्या ५०-६० जणांनाच निमंत्रण दिले व वरून "दिवसभर नुसतं वडापाव मिरच्या चरत असता लेको, लग्नात खास मठ्ठा ठेवलाय, प्या हवा तेव्हढा!" असं अगदी लाडाने सांगितलं.

मी आणि अमित सोबत जाणार होतो पण आयत्या वेळी अम्याने शेंडी लावली. ("आमरसासारखा जुलाब होतोय रे मित्रा, आताही तिकडूनच फोनवर बोलतोय. विश्वास नाही बसत, तर येऊन ब-") मी फोन बंद केला.

तर मी लग्नस्थळी पोचलो आणि शेवटच्या रांगेतील खुर्ची पकडून, परमेश्वराने मोठया कुशलतेने घडवलेल्या मनमोहक कलाकृती बघण्यात गर्क झालो. 

तेवढ्यात - 

"कुणीकडून आलात?"

मी वळून पाहिले तर एक आजोबा माझ्या बाजूच्या खुर्चीत प्रकट झाले होते. बहुदा त्यांचा नातू त्यांना वाऱ्यावर सोडून सामाजिक बांधिलकी दृढ करण्यात गुंतला असावा.

"कोथरूडहून आलो", म्या वदलो.

"अरे, कुणीकडून म्हणजे मुलाकडून की मुलीकडून?"

"मुलाकडून", मी ओशाळून म्हणालो.

"हम्म..." असं म्हणून ते मला वरून खालपर्यंत न्याहाळू लागले. बहुदा ते मुलीकडून असावेत.

" नाव काय?"

"गौतम", मी अनावश्यक माहिती देण्याच्या विरुद्ध आहे.

"आडनाव?" आजोबा बहुदा पत्रकार होते.

"सोमण".

"हम्म..."  पुन्हा न्याहाळणे सुरु. मी आपलं, मुली जसं ओढणी, पदर वगैरे सावरतात, तसे काहीसे अंगविक्षेप केले.

 "नवऱ्यामुलाशी काय नातं?"

"आम्ही दोघं एकाच कंपनीत काम करतो"

"काय काम करता?"

"संगणक प्रोग्रामर आहोत!" मी छाती पुढे काढून सांगितले. (एखाद्या ललनेने ऐकलं असावं का!?)

"हॅह, तुम्हां IT वाल्यांचा गल्लोगल्ली सुळसुळाट झालाय आहे नुसता" आजोबा करवादले. मला एकदम आम्ही सगळे उंदरांसारख्या मिश्या फुटून आपापल्या बिळात लॅपटॉप बडवत असल्यासारखे वाटू लागले. 

आजोबांचा पिच्छा सुटावा म्हणून मी रिकाम्या खुर्च्या शोधू लागलो. पण हॉल पूर्ण भरला होता. पुण्यात बहुदा २०० लोकं निमंत्रित असतील तर ५० आसनक्षमतेचाच हॉल बुक करत असावेत - सगळे लोक काय एकदम थोडी येतात? आणि आले तर घेतील ऍडजस्ट करून आपसांत! दोनच खुर्च्या रिकाम्या होत्या  - त्या म्हणजे स्टेजवरच्या राजा राणी खुर्च्या.  नवरा नवरी फ्रेश व्हायला (अम्याच्या भाषेत "कापडं बदलायला") गेले असावेत. 

मी तिथेही जाऊन बसलो असतो इतके इकडे आजोबा सुसाट सुटले होते. मी मग जीवावर उदार होऊन वाटेल ते बेधडक सांगत सुटलो... पण अचानक जेव्हा त्यांनी अगदी मर्मावर बोट ठेवले -

"पगार कितीसा असतो?" 

तेव्हा मात्र माझा आटा ढिला झाला.

"फार काही नसतो आजोबा...  रोजच्या चार विड्या आणि अधूनमधून एखादी हातभट्टीची चपटी यांचा खर्च सुटतो, बास होतं."

आजोबांची दातखिळी बसली असावी. त्याच संधीचा फायदा घेऊन मी तिथून अंतर्धान पावलो.

(२००७)


Sunday, August 12, 2018

आमच्यासाठी पण पार्क पाहिजेत

वीकएंडला छोट्या अदितीला घेऊन बागेत जातो, कालही गेलो. अनेक लोकं येतात, त्यापैकी एक आजोबा आणि त्यांची छोटी नात निहारिका. काही ओळख नाही पण बरेचदा दिसल्याने एखादं स्मित हास्य. 
तर, काल संध्याकाळी अदिती आणि निहारिका शेजारशेजारच्या झोपाळ्यांवर बसल्या होत्या आणि आम्ही झोके देत होतो. काही वेळानंतर ते आजोबा म्हणाले, "कधी कधी मलाही वाटतं झोपाळ्यांवर बसावं, सी सॉ करावा, घसरगुंडी वरून घसरत यावं... एकदा हिम्मत करून, कोणी मुलं नाहीत असं पाहून, झोपाळ्यावर बसलो... तर इतर लोकांनी अश्या नजरेने पाहिलं की चुपचाप उतरून गेलो. आमच्यासाठी पण असे पार्क पाहिजेत."
मी नुसतीच मान डोलावली, आणि थोड्या वेळाने म्हटलं, "कदाचित या वयात झोपाळ्यावरून पडले तर मार लागायची शक्यता असते म्हणून कदाचित करू देत नसावेत."
त्यावर ते हसत हसत म्हणाले, "अरे आम्ही म्हातारी माणसं तसंही बाथरूममध्ये घसरून पडत असतोच, त्याऐवजी झोक्यावरून पडलो तर तेवढाच बदल... नाही का?"

Sunday, July 29, 2018

हिंदी

छोट्या अदितीला शाळेत चार भाषाविषय आहेत हे कळल्यावर माझा तिच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला. तिच्या वयाचे असताना आम्हाला फक्त मराठी शिकवायचे, पण आम्हाला छडीची भाषाच अधिक चांगली समजायची. टिफीन घेऊन जावं एवढ्या सहजतेने आम्ही आपआपली छडी सोबत घेऊन जात असू, गुरुजी एखाद्याला झोडपताना त्यांची छडी मोडलीच तर पटकन हाताशी दुसरी असावी म्हणून. 
पुढे अर्थातच भाषा वाढल्या. मराठी मातृभाषा असल्याने आय वोज नोट मच वरीड अबाउट इट. चांगले टीचर्स लाभल्याने, आणि इंग्रजी पुस्तकांच्या आणि मुख्य म्हणजे चित्रपटांच्या परिशीलनाने तो पाया पक्का झाला होता. वांधे होते ते हिंदीचे.
एकतर गोव्यात हिंदीशी फारसा संपर्क येत नाही. आम्ही गोवेकर सरळ कोकणीत सुरुवात करतो, आणि त्याचा उपयोग झाला नाही तर निव्वळ हातवाऱ्यांवर पूर्ण संभाषण निभावून नेतो. पुढे पुण्यात असताना माझे मित्रमंडळ पण देशपांडे, खुले, बापट वगैरे असल्याने हिंदीचा उपयोग मर्यादितच होता. अधूनमधून पीएमटी बसेसमध्ये मी "थोडा बाजूला सरकके बसो की भैय्या" वगैरे बोलून हिंदीला धार काढून ठेवत असे.
मात्र हिंदीशी खरी मुंहभेट झाली ती नागपुरात. इकडे सगळेजण डायरेक हिंदीत सुरू होऊन जातात. बरं, हिंदी पण अशी की म्हटलं तर हिंदी म्हटलं तर मराठी. माझ्या ऑफिस कलीगने पहिल्याच दिवशी "आज जलदी घरी जाताना पडता भाई, आकाशात बादल येऊन राहिलेत" असं म्हटल्यावर मला भयंकर आनंद झाला, आणि तेव्हापासून मी जे हिंदीत तोंड सोडलंय ते आजतागायत.
फक्त एकदा ऑफिसमध्ये लंच जास्त झाल्यानं "पेट में गोला आया हय" असं म्हटलं तेव्हा, आणि एकदा बराच वेळ एका जागी बसून काम केल्यानं "अब मेरे पाव भारी हो रहे हय" असं म्हटलं तेव्हा, मुली का हसून राहिल्या ते मात्र समजलं नाहीये.

Sunday, July 22, 2018

काम....

"Work" आणि "Sex" साठी मराठीत "काम" हा एकच शब्द ज्याने योजिला त्याचा पुण्यातील (पाण्यात न बुडालेल्या) भिडे पुलावर, नागपूरची अस्सल संत्रा बर्फी आणि मुंबईचा वडा पाव देऊन सत्कार केला पाहिजे. या शब्दांनी माझ्या चिमुकल्या बालमनात किती गोंधळ घातला होता ते सांगणं कठीण आहे. (बा द वे, "चिमुकलं बालमन दुखावलं गेलं" हे वाक्य अनेक ठिकाणी वाचायला मिळायचं आणि लहानपणी खेळत असताना नेहमीच कोपर फोडून घेतल्यानं बालमन कोपरात असतं असं वाटायचं.)
तर काम.... कामक्रीडा म्हणजे दिवसभराचा कामाचा व्याप संपल्यावर खेळणं असं मला वाटत असे. कामचोर म्हणजे चोरून भलतेच पिक्चर पाहणारा असा माझा ग्रह होता. संस्कृतच्या गुरुजींनी "कामातूराणां न भयं न लज्जा" याचा अर्थ विचारल्यावर मी 'जो भरपूर काम करतो त्याला कोणाची भीती नसते' असे सांगितल्यावर गुरुजींनी पाठीत शाबासकीऐवजी धपाटा का घातला आणि दुसऱ्या दिवसापासून मी मराठी वर्गात का बसू लागलो हे मला आजतागायत समजलं नाही.
'चार पुरुषार्थापैकी काम एक आहे', हे वाचून भरपूर अंगमेहनत करावी असे मी ठरवेपर्यंत 'काम हा सहा षड्रिपुंपैकी एक आहे' असे वाचून बुचकळ्यात पडत असे. "माझं तुमच्याकडे काम आहे" अथवा "एक काम कराल का" अथवा "आपण कामाचं बोलूया" असे म्हटल्यावर समोरच्याने त्याचा भलताच अर्थ घेतला तर, याचं मला टेंक्शन यायचं.
नंतर मी मोठा झालो. काही गोष्टी रात्रीचा दिवस करून आत्मसात केल्या... तर काही मित्रांनी समजावल्या, आणि आपण कामाचा उगाचच बाऊ करत होतो असे लक्षात आले.