Showing posts with label पुस्तक. Show all posts
Showing posts with label पुस्तक. Show all posts

Sunday, February 5, 2012

किमयागार - अच्युत गोडबोले

बहुतेक वेळेस आपण जाणीवपुर्वक चांगल्या पुस्तकांचा शोध घेत असतो. परंतु, काही वेळेस मात्र एखादे पुस्तक ध्यानीमनी नसताना अवचित भेटून जाते. 
आमच्या घराशेजारच्या एका वाचनालयाचे सभासद व्हायचे अनेक दिवसांपासून ठरवत होतो. गेल्या आठवड्यात सहज गेलो असता टेबलवरच  अच्युत गोडबोले यांचे "किमयागार" पुस्तक दिसले. काही पानं चाळली अन वाचनालयाचा सभासद तर बनलोच, पण ते पुस्तक घेऊनच बाहेर पडलो!


"किमयागार" मध्ये आपल्याला भेटतात  मूलभूत शास्त्र शाखा (पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र) व त्यांच्या उपशाखांमधे काम करणारे ८००हून अधिक प्रतीभावान शास्त्रज्ञ. आर्यभट्ट, अरिस्टोटल, वराहमिहीरापासून ते स्टीफन हॊकींग, जयंत नारळीकरांपर्यंत.  काही विक्षिप्त, काही हेकेखोर, काही मत्सरी, काही संधीसाधू, काही दुर्दैवी... परंतु, सर्वच जण विलक्षण प्रतीभावंत.  पण हे पुस्तक म्हणजे नुसतीच शास्त्रज्ञांची निरस जीवनचरीत्रें नव्हे, तर त्यांच्या माध्यमातून लेखक आपल्याला या विश्वाचा इतिहास, रचना व मानवी जीवनाची सुरूवात ऊलगडत नेतात. 

पुस्तकाच्या  शेवटी असणारी संदर्भग्रंथांच्या यादीवरून नुसती नजर टाकली तरी लेखनासाठी घेतलेल्या परीश्रमांची आपल्याला जाणीव होते.

प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे या पुस्तकावर बिल ब्रायसन याच्या A Short History of Nearly Everything या उत्कृष्ट पुस्तकाचा थोडाफार प्रभाव दिसून येतो, परंतु, दोन्ही पुस्तकांचा मूळ गाभा एकच असला तरी सादरीकरणाची पध्दत मात्र भिन्न आहे.

लेखक श्री. अच्युत गोडबोले म्हणजे एक बहुआयामी व्यक्तीमत्व आहे. पहिली ते IIT पर्यंत प्रत्येक परीक्षेत पहिला क्रमांक पटकाविणारे असा त्यांचा लौकिक असून, IIT मधून रसायन शास्त्रात अभियांत्रिकी पदवी मिळविल्यावर त्यांनी संगणक क्षेत्रात ऊडी घेतली. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून काम करत असताना त्यांनी व्यवस्थापनशास्त्र, शास्त्रीय संगीत, अशा अनेक प्रांतात नुसती मुशाफिरीच नाही केली तर त्या- त्या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यावर उत्तम पुस्तके लिहीली आहेत. त्यांचे "बोर्डरूम" हे पुस्तक मी पाच वर्षांपुर्वी वाचले आणि ते सुद्धा फारच आवडले होते. आता त्यांचे "नादवेध" हे पुस्तक कधी मिळते त्याची मी वाट पाहात आहे.

"किमयागार"ची काही वैशिष्ट्ये म्हणजे संपूर्ण पुस्तक निव्वळ मराठी भाषेत असून प्रत्येक पानावर शास्त्रज्ञांची दुर्मिळ छायाचित्रे आहेत.  जोडीला सुबक, नेटकी छपाई व शेकडो छायाचित्रें यामुळे पुस्तकाचे स्वरूप अधिकच सुंदर झाले आहे.  पुस्तकाच्या शेवटी असणारा "नाही रे उजाडत" हा लेख प्रत्येकालाच अंतर्मुख करेल.

आजकाल ४००/- रूपयांत एखादा pizza जेमतेम येतो. त्याच किंमतीत ज्ञान-विज्ञानाची कवाडें सताड ऊघडी करणारे आणि प्रत्येकाच्याच घरात आवर्जून असावे असे हे पुस्तक आहे. 

Monday, November 21, 2011

राजा शिव-छत्रपति आणि श्रीमान योगी


शिव-चरीत्रांमध्ये बाबासाहेब पुरंदरेंचं राजा शिवछत्रपति आणि रणजित देसाई यांची श्रीमान योगी ही ऐतिहासिक कादंबरी यांचं स्थान अजोड आहे.
(वास्तविक, लेखाची सुरूवात "शिवाजी राजांवर अनेक उत्तमोत्तम पुस्तके लिहीली गेली असली तरी-" अशी करणार होतो, पण या दोन पुस्तकांशिवाय तिसरं नावंच आठवेना!)

"राजा शिवछत्रपति" पहिल्यांदा वाचलं तेव्हा ते एक-खंडी जाडजूड पुस्तक होतं, टाईप पण छोटा. वाचून वाचून हाताला रग लागली कि मी त्यातील सुंदर-सुंदर चित्रं रंगवायला लागायचो. (लायब्ररीचं पुस्तक असूनही, किंबहुना त्यामुळेच!)

 सर्वजण श्रीराम-श्रीकृष्ण यांच्या जोडीला शिवाजी महाराजांचं नाव घेत असल्याने मी शिवाजीला ही निळ्या रंगात रंगवायचो. चित्र रंगवून झाल्यावर त्याखाली "Gautam Soman, Std VI Div A" अशी लफ़्फ़ेदार सही करत असे. या ऊपद्व्यापाबद्द्ल नंतर लायब्ररीयनने झापल्यावर मी तिचं "खत्रुड साहिबा" असं नामकरणही केलं होतं.







"श्रीमान योगी"तील पल्लेदार वाक्यांनी आणि त्यातील वातावरण-निर्मीतीने प्रचंड प्रभाव पाडला.  मी घरी दिवसभर कंबरेला टोवेल गुंडाळून त्यात कपडे वाळत घालायची काठी तलवारीच्या रूबाबात खोचून फिरत असे. जिरेटोप न सापडल्याने, "दिल है की मानता नही" मध्ये आमिर खान घालतो तशी, प्लास्टिक क्याप डोक्याला घालत असे. आईला "मासाहेब" व धाकटा भाऊ सौरभला "शंभूराजे"(!) म्हणून कावून सोडलं होतं. (बाबांना मात्र "बाबा" म्हणत होतो). 

आमच्याकडे तेव्हा कुत्रा नव्हता, म्हणून घरच्या बोक्याचे नामकरण "वाघ्या" झाले होते. रोजचे संवाद सुद्धा "मासाहेब, आम्हास अजून भात वाढा", किंवा, "शंभूराजे,  DD2 च्यानल लावा" अशा तर्हेने चालत.

फक्त एका गोष्टीची कमी होती, ती म्हणजे महाराजांसारखी भरघोस दाढी, कारण महाराजांना तशी दाढी लहानपणापासूनच होती अशी माझी पक्की समजूत होती.

हा सर्व प्रकार साधारण महिनाभर चालला, त्यानंतर आमची वार्षिक परीक्षा सुरू झाली, व महाराजांना आपले लक्ष राज्यकारभारातून काढून घेऊन algebraic equations मध्ये गुंतवावे लागले.

नंतरची जवळपास दोन दशके अशीच गेली.

दोन महिन्यांपुर्वी "राजा शिवछत्रपति" ची दोन-खंडी १७वी आवृत्ती  घरी आली.  पुस्तक वाचून तर कधीचेच झालेय, चित्रें मात्र अद्याप रंगवायची बाकी आहेत...

Monday, July 5, 2010

काय वाचायचं?

माझा असा एक खास कंपू आहे कि ज्यांच्याशी बोलताना एक प्रश्न हमखास येतो, तो म्हणजे: "काय वाचतोयस?" मग प्रत्येकजण आपण काय वाचलं, काय वाचत आहे किंवा काय वाचावसं वाटतंय हे सांगतो. चर्चा वगैरे फ़ार होत नाही पण काही चांगल्या पुस्तकांची नावं समजतात.

गेल्या वर्षी माझं वाचन बरचंस थंडावलं होतं. लग्न झाल्यामुळे पुस्तकी "जीवन" वाचण्यापेक्षा ते प्रत्यक्ष जगण्यात जास्ती वेळ गेला.  तरीही काही चांगली इंग्रजी पुस्तकं वाचून झालीच. पण एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे आपण गेल्या २-३ वर्षांत एकही मराठी पुस्तक वाचलेलं नाहीए!
Crossword मध्ये गेलो. तिथल्या मराठी पुस्तक विभागातून तास दोन तास  फिरलो, पण एकही पुस्तक घ्यावेसे वाटेना. 
परवा एका मित्राशी बोलताना मी ही गोष्ट सांगितली, तर तो म्हणाला, "खरंय! मी पण परवा एका पुस्तक प्रदर्शनाला गेलो होतो, पण नवीन पुस्तकांपैकी एकही आवडलं नाही."

इतर दोघा-तिघांनीही साधारण अश्याच प्रतिक्रिया दिल्या.

असं का व्हावं?

पहिली गोष्ट अशी कि मराठीतली बहुतांश पुस्तकं "स्व" केंद्रीत असतात.. माझा सोमालियाचा प्रवास, माझे स्वादुपिंडाचे ऒपरेशन, माझा मित्र बबन्या, इत्यादी. काही पुस्तके रोचक असली तरी एकुणच हा प्रकार बोअर वाटतो.
दुसरं म्हणजे आपण लोकं फ़ार म्हणजे फ़ारंच भूतकाळात जगतो. मान्य आहे कि रामायण-महाभारत-शिवाजी-पेशवाई हे असे विषय आहेत कि ज्यांच्यावर शेकडोच काय हजारो पुस्तकं लिहीली तरी ती कमीच पडतील. पण म्हणून त्याच-त्याच गोष्टींचं किती चर्वण करायचं?

तिसरा मुद्दा असा कि मराठी लेखकांमध्ये नियमीतपणे उत्कृष्ट लेखन करणारे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच असतील. बाकी लोकं एक तर एक-दोन Bestsellers लिहून गायब होतात, किंवा दर वर्षाला अर्धा डझन सुमार पुस्तकांचा रतीब घालत राहतात. इंग्रजीमध्ये जसं सिडनी शेल्डन, डॆन ब्राऊन किंवा जे. के. रोलींग हमखास हिट ठरणारी पुस्तकं लिहीत जातात, तसं मराठीत सध्या आढळत नाही.

शेवटचा, पण कळीचा मुद्दा असा कि मराठी पुस्तकं फ़ूटपाथवर मिळत नाहीत. ("रस्त्यावर येणं" या प्रकाराचं मराठी माणसाला एकुणंच वावडं आहे!) पुस्तकांच्या किंमती पाहता सर्वच पुस्तकं दुकानातून घेणं परवडत नाही. विशेषत: Fiction (कथा कादंबरी) प्रकारातील पुस्तकं ज्यांचा एकदा वाचून झाल्यावर काहीच उपयोग नसतो.


मला असं अजिबात म्हणायचं नाही कि मराठीत काही चांगलं लेखन होतच नाहीये.   कदाचित अनेक उत्तमोत्तम पुस्तकं कदाचित माझ्यापर्यंत पोचतही नसतील. पण वस्तुस्थिती अशी आहे कि तरूण पिढीला आकर्षित करणारे विषय सध्या मराठीत हाताळले जात नाहीत.

काय वाचायला आवडेल?
  • अच्युत गोडबोले यांची व्यवस्थापन शास्त्रावरची व संगणक विश्वावरची पुस्तकं मला फ़ारच आवडली होती. या विषयावर पुस्तकं वाचायला नक्कीच आवडेल.
  • डॊ. जयंत नारळीकर, डॊ. बाळ फोंडके, निरंजन घाटे यांनी मराठी विज्ञानकथा हा प्रकार अतिशय समर्थपणे हाताळला होता. आता नव्या दमाच्या लेखकांची नितांत गरज आहे.
  • स्व-व्यवस्थापन, कामाचं/वेळेचं नियोजन यावर, भारतीय जीवनशैलीला अनुसरून असणारी पुस्तकं मला हवी आहेत.
  • शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवणारी एखादी रहस्य-कथा किंवा स्व. जयवंत दळवी, स्व. पु. ल.देशपांडे यांच्या शैलीतला खुसखुशीत विनोद कुठे वाचायला मिळेल?

Tuesday, April 29, 2008

ययाति

ययाति- वि स खांडेकर
वि. . खांडेकरांच्या "ययाति" ने मराठीला पहिला "ज्ञानपीठ" पुरस्कार मिळवून दिला आहे, एवढे सांगितलेतरी या साहित्यकृतीचे महत्त्व ध्यानी येते.

"ययाति" महाभारतातील एका उपकथानकावर आधारीत आहे. नहुषपुत्र राजा ययाति, दैत्यगुरु शुक्राचार्यांचीकन्या देवयानी, दैत्यराज वृषपर्व्याची मुलगी शर्मिष्ठा देवगुरू बृहस्पतीपुत्र कच, ही या कादंबरीतीलप्रमुख पात्रें. पैकी ययाति -देवयानी - शर्मिष्ठा यांच्या आत्मनिवेदनातून कथा उलगडत जाते. मानवीजीवनाची सफलता इतिकर्तव्यता यावर या कादंबरीत सखोल चिंतन करण्यात आले आहे. मुख्य कथानकलहान असले तरी मानवे मनोविकारांचे दर्शन, भावनिक गुंतवणुक या द्वारे कथेचे रूपांतर एका नाट्यमयसंघर्षात करण्यात वि. . खांडेकर यशस्वी झाले आहेत.

वासनातिरेकाने माणूस किती रसातळाला जाऊ शकतो याचे विदारक चित्रण आपल्याला कादंबरीत दिसते - राजा ययातिच्या रूपात. या उलट, माणूस आपल्या आत्मिक सामर्थ्याच्या जोरावर किती उन्नती करू शकतो, ते कच दाखवून देतो. तो ययाति- देवयानी- शर्मिष्ठा या त्रयील जीवनाचे रहस्य वेळोवेळी विशद करून सांगतो.

"ययाति"च्या कथाभागाइतकेच तिच्या "पार्श्वभूमी" लेखकाने मांडलेले विचारही तेवढेच मनन करण्याजोगेआहेत. कथावस्तू पौराणिक असली तरी तिचा आशय कालातित कसा आहे, हे आपल्याला तिथे उमजूनयेते.अर्थगर्भ, उच्च विचारांनी परीपूर्ण असे साहित्य वाचण्याची आवड असलेया प्रत्येकाने "ययाति" वाचलीच पाहिजे!
प्रकाशक: देशमुख आणि कंपनी
पृष्ठें: ४२५

२५ नोव्हेंबर २०००

Monday, April 28, 2008

मृत्युंजय

कर्ण - महाभारतातील एक अलौकिक व्यक्तीमत्व. महाभारतातील कुठलीच व्यक्तिरेखा सामान्य नाही; परंतु त्या सर्वांतही कर्ण आपला स्वतंत्र ठसा उमटवून जातो.वस्तुत: सूर्यपूत्र असलेल्या, पण आयुष्यभर सूतपूत्र म्हणून अवहेलना सहन करीत जगलेल्या कर्णाच्या जीवनावर ही कादंबरी आहे.

कादंबरीची शैली निवेदनात्मक आहे. कर्णमाता कुंती, कर्णबंधू शोण, कर्णपत्नी वृषाली, कर्णसखा दूर्योधन, श्रीकृष्ण स्वत: कर्ण यांच्या निवेदनातून कर्णाचा जीवनपट त्या बरोबरच महाभारतकथा उलगडत जाते.प्रासादिक, अलंकारांनी परीपूर्ण अशी भाषा विलक्षण संवाद हा या कादंबरीच आत्मा आहे. लिहून ठेवावीत अशी चिंतनगर्भ वाक्ये पाना-पानावर आहेत. ती लिहून काढली तर तो एक अमूल्य असा साहित्यिक ठेवा बनेल.
कर्णाची चरीत-कहाणी सांगत असताना त्याच्या अवती-भवती असणाया व्यक्तिरेख रंगविण्यातही शिवाजीसावंत सफल झाले आहेत. त्यामुळे हा ग्रंथराज कुठेच एकसुरी झाल्यासारखे वाटत नाही. महाभारतकालीनभाषा, वेशभूषा, चालीरीती, समाजव्यवस्था, आदी गोष्टींबद्दल लेखकाने घेतलेले परीश्रम सहज कळून येतात.

आज "मृत्युंजय" हा मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड मानला जातो. ही कादंबरी वाचलेल्या कोणत्याही मराठी वाचकाचे वाचन हे अपूर्णच मानावे लागेल.कर्णावर "मृत्युंजय" पूर्वी नंतर बरेच लिखाण झाले आहे; पण ज्याप्रमाणे माधवराव पेशवे म्हटले की "स्वामी" आठवते, त्याचप्रमाणे कर्ण म्हटले की डोळ्यापूढे फक्त एकच नाव येते - मृत्युंजय!

१४ नोव्हेंबर २०००

Thursday, April 24, 2008

गांधीहत्या आणि मी

गांधीहत्या आणि मी
-गोपाळ वि. गोडसे

३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींची हत्या झाल्यावर या कटातील आरोपी पकडले जाऊन त्यापैकी नथूराम गोडसेनारायण आपटे यांना फाशी देण्यात आले, तर इतर तिघांना जन्मठेप झाली. गांधी-हत्येविरूध्दचा लोकक्षोभ इतका तीव्र होता की नथूरामने आपली बाजू न्यायालयात नि:संदिग्ध शब्दांत मांडूनही त्याला माथेफिरू ठरविण्यात आले. नथूरामचे बंधू व या कटातील एक आरोपी गोपाळ गोडसे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा प्रतिपाद्य विषय हा आहे की गांधी-हत्त्या हे भावनेच्या भरात, परीणाम न पाहता केलेले आततायी कृत्य नसून ती थंड डोक्याने योजिलेली राजकीय हत्त्या होती.
प्रस्तुत ग्रंथात, पकडले गेल्यानंतरचे आरोपींचे वर्तन, त्यांच्यावरील अभियोग, गोडसे-आपटे यांची फाशी, उर्वरीतांची जन्मठेप व त्यांचे कौटूंबिक जीवन याचा सविस्तर आलेख मांडला आहे. अर्धा डझन छायाचित्रें पुस्तकाला ऐतिहासिक महत्व प्राप्त करून देतात.
गांधी-हत्त्येची ही दूसरी बाजू जिज्ञासूंनी जरूर वाचावी.
(१८ मे २०००)

गंधाली

गंधाली
-रणजित देसाई
"स्वामी"कार रणजित देसाई यांचा हा ऐतिहासिक कथा-संग्रह. या "विराणी", "असा रंगला विडा", "अशी छेडिली तार", "अशी रंगली प्रीत" व "नक्षत्रकथा" या पाच कथा आहेत. पैकी, "विराणी" (सलीम-नूरजहान) व "अशी रंगली प्रीत"(बाजीराव-मस्तानी) या निखळ प्रेमकथा असून इतर कथांनाही प्रेमभावनेची तरल किनार आहे.
त्या-त्या ऐतिहासिक काळात चपखल बसणारी शब्दरचना, केवळ शब्दांनी व्यक्तीचित्र साकार करण्याची हातोटी व भावपूर्ण प्रसंग यामूळे वाचकाला आपण त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदारच आहोत असे वाटत राहते. टिपून ठेवावेत असे संवाद तर पानो-पानी आहेत.
ऐतिहासिक कथांची आवड असणाया वाचकांसाठी हे पुस्तक म्हणजे पंचपक्वान्नांची मेजवानीच आहे.
(१३ ऒगष्ट २०००)