Showing posts with label पुणे. Show all posts
Showing posts with label पुणे. Show all posts

Monday, May 27, 2024

पुणेरी लग्न​!

 "पुण्यात काय पहावं?" असा प्रश्न विचारला तर 'शनिवारवाडा' ते 'शनीपार' अशा रेंजमध्ये काहीही उत्तरे येऊ शकतात. माझे काही जुने (व आता जाणते झालेले) मित्र "दिवसा फर्ग्युसन व रात्री कॅम्प" असं सांगतात व स्वानुभवाने ते पटलंय पण.

पण... पुण्यात आवर्जून अनुभवावी अशी एक गोष्ट म्हणजे - इथे होणारी लग्नं. 

हल्लीचीच गोष्ट. ऑफिस कलीगचं लग्न ठरलं. त्याच्या आयुष्यातील हा पहिलावहिला रोमहर्षक प्रसंग असल्याने त्याने अगदी निवडक व जिवलग अश्या ५०-६० जणांनाच निमंत्रण दिले व वरून "दिवसभर नुसतं वडापाव मिरच्या चरत असता लेको, लग्नात खास मठ्ठा ठेवलाय, प्या हवा तेव्हढा!" असं अगदी लाडाने सांगितलं.

मी आणि अमित सोबत जाणार होतो पण आयत्या वेळी अम्याने शेंडी लावली. ("आमरसासारखा जुलाब होतोय रे मित्रा, आताही तिकडूनच फोनवर बोलतोय. विश्वास नाही बसत, तर येऊन ब-") मी फोन बंद केला.

तर मी लग्नस्थळी पोचलो आणि शेवटच्या रांगेतील खुर्ची पकडून, परमेश्वराने मोठया कुशलतेने घडवलेल्या मनमोहक कलाकृती बघण्यात गर्क झालो. 

तेवढ्यात - 

"कुणीकडून आलात?"

मी वळून पाहिले तर एक आजोबा माझ्या बाजूच्या खुर्चीत प्रकट झाले होते. बहुदा त्यांचा नातू त्यांना वाऱ्यावर सोडून सामाजिक बांधिलकी दृढ करण्यात गुंतला असावा.

"कोथरूडहून आलो", म्या वदलो.

"अरे, कुणीकडून म्हणजे मुलाकडून की मुलीकडून?"

"मुलाकडून", मी ओशाळून म्हणालो.

"हम्म..." असं म्हणून ते मला वरून खालपर्यंत न्याहाळू लागले. बहुदा ते मुलीकडून असावेत.

" नाव काय?"

"गौतम", मी अनावश्यक माहिती देण्याच्या विरुद्ध आहे.

"आडनाव?" आजोबा बहुदा पत्रकार होते.

"सोमण".

"हम्म..."  पुन्हा न्याहाळणे सुरु. मी आपलं, मुली जसं ओढणी, पदर वगैरे सावरतात, तसे काहीसे अंगविक्षेप केले.

 "नवऱ्यामुलाशी काय नातं?"

"आम्ही दोघं एकाच कंपनीत काम करतो"

"काय काम करता?"

"संगणक प्रोग्रामर आहोत!" मी छाती पुढे काढून सांगितले. (एखाद्या ललनेने ऐकलं असावं का!?)

"हॅह, तुम्हां IT वाल्यांचा गल्लोगल्ली सुळसुळाट झालाय आहे नुसता" आजोबा करवादले. मला एकदम आम्ही सगळे उंदरांसारख्या मिश्या फुटून आपापल्या बिळात लॅपटॉप बडवत असल्यासारखे वाटू लागले. 

आजोबांचा पिच्छा सुटावा म्हणून मी रिकाम्या खुर्च्या शोधू लागलो. पण हॉल पूर्ण भरला होता. पुण्यात बहुदा २०० लोकं निमंत्रित असतील तर ५० आसनक्षमतेचाच हॉल बुक करत असावेत - सगळे लोक काय एकदम थोडी येतात? आणि आले तर घेतील ऍडजस्ट करून आपसांत! दोनच खुर्च्या रिकाम्या होत्या  - त्या म्हणजे स्टेजवरच्या राजा राणी खुर्च्या.  नवरा नवरी फ्रेश व्हायला (अम्याच्या भाषेत "कापडं बदलायला") गेले असावेत. 

मी तिथेही जाऊन बसलो असतो इतके इकडे आजोबा सुसाट सुटले होते. मी मग जीवावर उदार होऊन वाटेल ते बेधडक सांगत सुटलो... पण अचानक जेव्हा त्यांनी अगदी मर्मावर बोट ठेवले -

"पगार कितीसा असतो?" 

तेव्हा मात्र माझा आटा ढिला झाला.

"फार काही नसतो आजोबा...  रोजच्या चार विड्या आणि अधूनमधून एखादी हातभट्टीची चपटी यांचा खर्च सुटतो, बास होतं."

आजोबांची दातखिळी बसली असावी. त्याच संधीचा फायदा घेऊन मी तिथून अंतर्धान पावलो.

(२००७)


Tuesday, May 11, 2010

पुणेरी पाट्या

पुण्यातील इरसाल पाट्या हा पुणेकरांसाठी अभिमानाचा विषय आहे. आम्ही (च्यामारी! पुण्याबद्दल नुस्तं लिहायला लागलो तरी "मी" चा "आम्ही" होऊन जातो!) पुण्यात संगणक भाषा शिकत असता (पक्षी: डेक्कन जिमखाना, क्याम्प वगैरे प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत असता) अश्या अनेक पाट्या आमच्या नजरेस पडल्या, तर काही ई-मेल मध्ये वाचायला मिळाल्या. 
काही नमुने आपल्यासाठी पेश करत आहे...

  • कृपया वस्तू ऊधार मागू नये. अपमान होईल.
  • दारावरील बेल फ़क्त एकदाच वाजवावी. विजेचे बिल आम्ही भरतो.
  • तीनदा बेल वाजवूनही दरवाजा न उघडल्यास समजावे कि आम्हांस आपणास भेटावयाचे नाही.
  • आम्ही शाकाहारी आहोत, पण आमचा कुत्रा शाकाहारी नाही.
  • इथे मुत्रविसर्जन करू नये. केल्यास कायमचा ईलाज केला जाईल.
  • इथे कम्प्युटर सीडीज, फ़्लॊपीज व स्वस्त दरात नारळ मिळतील.
  • इथे हापूस आंबे, कोकम सरबत व परकर मिळतील.
  • गिर्हाईक हा राजा असतो. राजा कधीही ऊधार मागत नाही.
  • मस्तानी पार्सल करून मिळेल.
  • मंदिरात जास्त वेळ बसू नये. तुम्ही रिकामटेकडे असाल, पण ही बाग नाही.
  • शांतता राखा. थुंकू नका. माणसासारखे वागा.
  • सेल्समनांस सुचना: सदर इमारतीत विक्री न झाल्यास सोसायटी जबाबदार नाही.
  • सोसायटीच्या सभासदांशिवाय अन्य अवजड वाहनांस प्रवेश वर्ज्य.
  • इथे जोशी रहात नाहीत. पुन्हा पुन्हा विचारू नये.
    (व त्याच घरासमोरील पाटी): जोशी इथे रहातात. इकडे-तिकडे विचारू नये.
  • फ़ाटकावरील आतील बाजूची पाटी: बाहेर जाताना फ़ाटक बंद न केल्यास पुन्हा आत घेतले जाणार नाही.
  • बंगला रिकामा आहे. आत चोरण्यासारखे काहिही नाही. विनाकारण कष्ट घेऊ नये.
  • येथे चोरी करणारा नेहमी पकडला जातो. याची कृपया नोंद घ्यावी.
  • भिकारी लोकांस सुचना: कुत्रे व भुतांपासून सावध रहा.
  • सेल्समननी आत येऊ नये. सेल्सगर्ल आत आल्यास मालक जबाबदार नाही.
  • पत्ता सांगायचे ५ रूपये पडतील. हे असे का लिहीले आहे हे सांगायचे १० रूपये पडतील.
  • पोष्टमनास सुचना: कृपया पत्रें या खिडकीतून आत टाकू नयेत. आमटीत पडतात, चव बिघडते.
  • आजचे ताजे पदार्थ: भजी व मिसळ. मुळव्याधीचे औषध मिळेल.
  • आम्ही ऊपवासाचे पदार्थ वेगळ्या तव्यावर करतो.
  • लाईट गेल्यास कॆण्डल-लाईट डिनरचा वेगळा चार्ज पडेल.
  • वेटरला टिप देऊ नये. आम्ही त्यांना पुरेसा पगार देतो.
  • बाहेरील पदार्थ आत आणू नयेत. आतील पदार्थ बाहेर नेऊन खाल्ले तर चालेल.
  • कृपया चूळ भरताना घाणेरडे आवाज काढू नयेत. 
  • आपल्यामुळे इतरांना त्रास झाला तर इतरांमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो.
  • ए नाही अहो रिक्षावाले म्हणा.
  • रिक्षात तंबाखु, गुटखा खाऊन बसू नये व बसून खाऊ नये.
  • अनोळखी वस्तू किंवा व्यक्तींस स्पर्श करू नये.
  • गाडीवरील धुळीत लिहिलेले वाक्य: आता तरी पुसा!
  • गॆरेज: इथे अपली वाहणे कालजीपूवक दुरुस्ती करूण मिलेल
  • इथे अर्जंट शेवया करून व ब्लाऊज शिवून मिळेल.
  • येथे लघवी करू नये. वरून लोकं पहातात.
  • "दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्र": डेअरी!
  • "दंतोपचार, दंत दुरूस्ती व दंतौषधी विक्री केन्द्र" : डेन्टल क्लिनीक!

Friday, April 25, 2008

पी. एम टी. प्रवासाचे फ़ायदे

मित्रहो,पुण्यातल्या पी. एम टी. बसेस बद्दल भरपूर बोलले, लिहिले जाते... थोडेसे चांगले, बरेचसे वाईट. तरीही लोकं पी. एम टी. ने प्रवास करणं काही सोडत नाहीत. आतापर्यंत मला वाटायचे कि ते नाईलाजापोटी असावे. परंतु काही क्षणांपुर्वीच मला पी. एम टी. प्रवासाचे फ़ायदे ऊमगले, आणि ’जे जे आपणांसी ठावे...’ या ऊक्तीनुसार मी ते आपल्याला सांगत आहे.

१. पी. एम टी. चे चालक आपली गाडी प्रकाश वेगाने हाकायचा आटोकाट प्रयत्न करत असतात. आईन्स्टाईनच्या सापेक्षता सिध्दांतानुसार, प्रकाश वेगाने जाणाय़ा वस्तुसाठी कालगणना थांबते. याचाच अर्थ - तुम्ही पी. एम टी. ने जितका प्रवास कराल तेवढे तुमचे आयुष्य वाढेल.
२. पुण्यात पी. एम टी. शिवाय प्रवासाचे दुसरे साधन म्हणजे रिक्षा अथवा स्वत:ची बाईक. समजा तुम्ही यापैकी एकाने चालला आहात आणि (देव करो, असे न होवो, पण) पी. एम टी. ने धडकले. जास्त मार कोणाला बसेल? ( या कूट-प्रश्नाचे ऊत्तर पडताळून पहाण्यासाठीच पी. एम टी. चालक वारंवार प्रयोग करत असतात).बहुसंख्य जन्तेच्या असे ध्यानात आले आहे की आपण पी. एम टी. च्या आतच जास्त सुरक्षित राहु.
३.पी. एम टी. जीवन-शिक्षण देते. काही कारण नसताना भांडण कसे ऊकरून काढावे, चालत्या गाडीत मारामारी कशी करावी, हे रोजच्या जीवनात ऊपयोगी पडणारे शिक्षण पी. एम टी. त मिळते.
४. पी. एम टी. भाषा-शिक्षण देते. कमीत कमी शब्दांत दुसयाचा अपमान कसा करावा, नव-नवीन म्हणी व वाक्प्रचार आपल्याला पी. एम टी. त शिकायला मिळतात.
५. पायाच्या एका बोटावर उभे राहू शकता? एका बोटाने वरच्या हॆन्डल-बारला लोंबकळु शकता? योगासनांचे हे नवीन प्रकार शिकण्यास पी. एम टी. नेच प्रवास केला पाहिजे.
६. गीतेत श्रीकृष्णांनी सांगितले आहे, " तू फ़क्त कर्म कर... फ़लाची अपेक्षा धरू नकोस.." त्याचप्रमाणे पी. एम टी. त बसणे एवढेच आपल्या हातात असते. इच्छित स्थळी सुखरूप पोहोचू की नाही, पोहोचल्यास वेळेवर पोहोचू की नाही यासारख्या क्षुद्र प्रश्नांचा भार त्या "चक्र-धरा"वर टाकून निवांत व्हावे. दुसरे म्हणजे, पी. एम टी. त बसलेला मनुष्य-प्राणी पुढील बरेच तास काहीच काम करु शकत नाही. एकुण काय तर, पी. एम टी. "निष्काम कर्मयोग आचरणात आणण्यास भाग पाडते.
७. पी. एम टी. त बसल्या-बसल्या तुम्हाला जगभरातील सर्व समस्यांची ऊत्तरे विनासायास मिळतात. अगदी... डासांपासून संरक्षण कसे करावे, इथपासून ते "नासा"त निवड व्हायला काय करावे, इथपर्यंत.
८. पी. एम टी. मधील सीट्सच्या मागे लिहिलेला मजकूर आपले सामान्य-न्यान वाढवितो. अन्यथा, रामाचे रेणुकावर कसे आणि किती प्रेम आहे, अमर नावाचा कुणीतरी "बैल" आहे, ही माहिती आपल्याला कुठल्या पुस्तकात भेटली असती?
९. पी. एम टी. त बसून खाच-खळग्यांनी भरलेल्या कर्वे रोडवरून अंगचे एकही हाड खिळखिळे न होता प्रवास करू शकणे, ही डब्ल्यु. डब्ल्यु. एफ़. कुस्ती-स्पर्धेत भाग घेण्यासाठीची पात्रता फ़ेरी मानली जाते ( किंवा मानली जायला हरकत नाही).
१०. पी. एम टी. त अगदी घरगुती वातावरण असते. चालक-वाहक-प्यासिंजर आपुलकीने एकमेकांच्या तीर्थरूपांची चौकशी करतात. प्रेमात येऊन गालांवर चापट मारणे वगैरे प्रकार अगदी खेळीमेळीत चालू असतात.

तर, वाचकहो! अशी ही आमची पी. एम टी..... आम्ही पुणेकर त्यातून प्रवास करतो, कारण कुणीच नाही प्रवास केला तर पी. एम टी. चालणार कशी? पी. एम टी. नाही चालली तर अपघात होणार कसे? अपघातच नाही झाले तर पेपरवाले रोज उठून छापणार तरी काय? आम्ही चहा पिता-पिता वाचणार काय? आणि तावातावाने चर्चा करणार तरी कशावर??

(२ जून २००६)