Sunday, August 12, 2018

आमच्यासाठी पण पार्क पाहिजेत

वीकएंडला छोट्या अदितीला घेऊन बागेत जातो, कालही गेलो. अनेक लोकं येतात, त्यापैकी एक आजोबा आणि त्यांची छोटी नात निहारिका. काही ओळख नाही पण बरेचदा दिसल्याने एखादं स्मित हास्य. 
तर, काल संध्याकाळी अदिती आणि निहारिका शेजारशेजारच्या झोपाळ्यांवर बसल्या होत्या आणि आम्ही झोके देत होतो. काही वेळानंतर ते आजोबा म्हणाले, "कधी कधी मलाही वाटतं झोपाळ्यांवर बसावं, सी सॉ करावा, घसरगुंडी वरून घसरत यावं... एकदा हिम्मत करून, कोणी मुलं नाहीत असं पाहून, झोपाळ्यावर बसलो... तर इतर लोकांनी अश्या नजरेने पाहिलं की चुपचाप उतरून गेलो. आमच्यासाठी पण असे पार्क पाहिजेत."
मी नुसतीच मान डोलावली, आणि थोड्या वेळाने म्हटलं, "कदाचित या वयात झोपाळ्यावरून पडले तर मार लागायची शक्यता असते म्हणून कदाचित करू देत नसावेत."
त्यावर ते हसत हसत म्हणाले, "अरे आम्ही म्हातारी माणसं तसंही बाथरूममध्ये घसरून पडत असतोच, त्याऐवजी झोक्यावरून पडलो तर तेवढाच बदल... नाही का?"

Sunday, July 29, 2018

हिंदी

छोट्या अदितीला शाळेत चार भाषाविषय आहेत हे कळल्यावर माझा तिच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला. तिच्या वयाचे असताना आम्हाला फक्त मराठी शिकवायचे, पण आम्हाला छडीची भाषाच अधिक चांगली समजायची. टिफीन घेऊन जावं एवढ्या सहजतेने आम्ही आपआपली छडी सोबत घेऊन जात असू, गुरुजी एखाद्याला झोडपताना त्यांची छडी मोडलीच तर पटकन हाताशी दुसरी असावी म्हणून. 
पुढे अर्थातच भाषा वाढल्या. मराठी मातृभाषा असल्याने आय वोज नोट मच वरीड अबाउट इट. चांगले टीचर्स लाभल्याने, आणि इंग्रजी पुस्तकांच्या आणि मुख्य म्हणजे चित्रपटांच्या परिशीलनाने तो पाया पक्का झाला होता. वांधे होते ते हिंदीचे.
एकतर गोव्यात हिंदीशी फारसा संपर्क येत नाही. आम्ही गोवेकर सरळ कोकणीत सुरुवात करतो, आणि त्याचा उपयोग झाला नाही तर निव्वळ हातवाऱ्यांवर पूर्ण संभाषण निभावून नेतो. पुढे पुण्यात असताना माझे मित्रमंडळ पण देशपांडे, खुले, बापट वगैरे असल्याने हिंदीचा उपयोग मर्यादितच होता. अधूनमधून पीएमटी बसेसमध्ये मी "थोडा बाजूला सरकके बसो की भैय्या" वगैरे बोलून हिंदीला धार काढून ठेवत असे.
मात्र हिंदीशी खरी मुंहभेट झाली ती नागपुरात. इकडे सगळेजण डायरेक हिंदीत सुरू होऊन जातात. बरं, हिंदी पण अशी की म्हटलं तर हिंदी म्हटलं तर मराठी. माझ्या ऑफिस कलीगने पहिल्याच दिवशी "आज जलदी घरी जाताना पडता भाई, आकाशात बादल येऊन राहिलेत" असं म्हटल्यावर मला भयंकर आनंद झाला, आणि तेव्हापासून मी जे हिंदीत तोंड सोडलंय ते आजतागायत.
फक्त एकदा ऑफिसमध्ये लंच जास्त झाल्यानं "पेट में गोला आया हय" असं म्हटलं तेव्हा, आणि एकदा बराच वेळ एका जागी बसून काम केल्यानं "अब मेरे पाव भारी हो रहे हय" असं म्हटलं तेव्हा, मुली का हसून राहिल्या ते मात्र समजलं नाहीये.

Sunday, July 22, 2018

काम....

"Work" आणि "Sex" साठी मराठीत "काम" हा एकच शब्द ज्याने योजिला त्याचा पुण्यातील (पाण्यात न बुडालेल्या) भिडे पुलावर, नागपूरची अस्सल संत्रा बर्फी आणि मुंबईचा वडा पाव देऊन सत्कार केला पाहिजे. या शब्दांनी माझ्या चिमुकल्या बालमनात किती गोंधळ घातला होता ते सांगणं कठीण आहे. (बा द वे, "चिमुकलं बालमन दुखावलं गेलं" हे वाक्य अनेक ठिकाणी वाचायला मिळायचं आणि लहानपणी खेळत असताना नेहमीच कोपर फोडून घेतल्यानं बालमन कोपरात असतं असं वाटायचं.)
तर काम.... कामक्रीडा म्हणजे दिवसभराचा कामाचा व्याप संपल्यावर खेळणं असं मला वाटत असे. कामचोर म्हणजे चोरून भलतेच पिक्चर पाहणारा असा माझा ग्रह होता. संस्कृतच्या गुरुजींनी "कामातूराणां न भयं न लज्जा" याचा अर्थ विचारल्यावर मी 'जो भरपूर काम करतो त्याला कोणाची भीती नसते' असे सांगितल्यावर गुरुजींनी पाठीत शाबासकीऐवजी धपाटा का घातला आणि दुसऱ्या दिवसापासून मी मराठी वर्गात का बसू लागलो हे मला आजतागायत समजलं नाही.
'चार पुरुषार्थापैकी काम एक आहे', हे वाचून भरपूर अंगमेहनत करावी असे मी ठरवेपर्यंत 'काम हा सहा षड्रिपुंपैकी एक आहे' असे वाचून बुचकळ्यात पडत असे. "माझं तुमच्याकडे काम आहे" अथवा "एक काम कराल का" अथवा "आपण कामाचं बोलूया" असे म्हटल्यावर समोरच्याने त्याचा भलताच अर्थ घेतला तर, याचं मला टेंक्शन यायचं.
नंतर मी मोठा झालो. काही गोष्टी रात्रीचा दिवस करून आत्मसात केल्या... तर काही मित्रांनी समजावल्या, आणि आपण कामाचा उगाचच बाऊ करत होतो असे लक्षात आले.

Friday, January 29, 2016

नव्या युगाचे नवीन ऊखाणे: भाग १


सध्या लग्न सराईचा मौसम चालू आहे. नेहमीचेच ऊखाणे म्हणून / ऐकून वैतागलेल्या सर्वांसाठी प्रस्तुत करत आहे, नव्या युगाचे नवीन ऊखाणे: भाग १

न्यूटनची Gravity, आईन्स्टाईनची Relativity,
अमुकरावांचं नाव घेते, मी त्यांची Sweety!


न्यूटनच्या डोक्यावर पडलं होतं Apple
अमुकरावांचे केस विरळ, पडणारेय त्यांना टक्कल


जसं श्रोडींगरचं Cat, जसं पाव्हलोव्हचं श्वान,
फक्त माझ्यासोबत शोभून दिसतं अमुकरावांचं ध्यान

Monday, January 4, 2016

समज - गैरसमज: आठवड्याचे वार


आठवड्याचे वार सात (का बुवा?). प्रत्येक वाराबद्दल भारतीय समाजमनात अनेक समज / रूढी प्रचलित आहेत. सदर लेखात अश्या समजुतींचा संग्रह करण्याचा प्रयत्न आहे.


  • मंगळवारी नवीन कपडे घालू नयेत. 
  • देणी द्यायची असतील अथवा पैसे उधार । कर्जाऊ द्यायचे असतील तर ते मंगळवारी द्यावेत.
  • बुधवारी माहेराहून सासरी जाऊ नये.
  • बुधवारी नवीन कपडे घ्यावेत अथवा परीधान करावेत.
  • शुक्रवारी पैसे देऊ नयेत. वसुली करावी. पैसे कर्जाऊ घ्यायचे असले तरी अवश्य घ्यावेत.
  • शनीवारी नखं काढू नयेत. तेल, लोखंडाच्या वस्तु, चपला विकत घेऊ नये.
  • रविवारी वास्तुशांती करु नये. (रविवारी वास्तुशांतीचे मुहुर्त मी आजपर्यंत पाहिले नाहियेत).


  • ज्यांच्या घरी गाई-म्हशी असतील त्यांनी आठवड्यातील एक दिवस दूध पिऊ नये. (अर्थातच तान्ह्या मुलांचा अपवाद!)

बोर झालं नसेल तर अजून वाचा:  समज - गैरसमज: भाग पहिला


टीप: 
यातील समज / रूढींशी मी सहमत आहे असे मुळीच नसून केवळ त्यांची कुठेतरी नोंद असावी एवढाच विचार या मागे आहे. 


Thursday, December 3, 2015

गिरीश कुबेर यांस...


गिरीश कुबेर यांस:


"लोकसत्ता" मधील आपले अग्रलेख दिवसेंदिवस शिवराळ होत चालल्याचे पाहून काही महिन्यांपुर्वीच तो वाचणे बंद केले होते. पण फ़ेसबुकवर share झालेला राष्ट्रगीताच्या अवमानाचे समर्थन करणारा अग्रलेख पाहून मन पुन्हा उद्विग्न झाले.

"टाटायन" सारख्या अप्रतिम पुस्तकाचे लेखक म्हणून जो थोडा आदर वाटत होता तो तुम्ही धुळीला मिळवला आहे.

राष्ट्रगीत, राष्ट्रीय ध्वज, हे माझ्यासारख्या अगणित भारतीयांचे मानबिंदू आहेत आणि त्यांचा अपमान जो कोणी करेल अथवा अश्या अवमानाचे समर्थन करेल त्याला क्षमा नाही.

ईश्वर आपल्याला सद्बुद्धि देवो.

Wednesday, October 28, 2015

शब्द!


घासावा शब्द | तासावा शब्द |
तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||
शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा
बेतावेत शब्द | शास्त्राधारे ||

बोलावे मोजके | नेमके ,खमंग ,खमके |
ठेवावे भान | देश ,काळ ,पात्राचे ||
बोलावे बरे | बोलावे खरे |
कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||

कोणाचेही वर्म | व्यंग आणि बिंग |
जातपात धर्म | काढूच नये ||
थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे |
मुद्देसुद बोलणे | हि संवाद कला||

शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान ,कर्म ,भक्ती |
स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||
शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |
शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||

जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता |
पाणी ,वाणी ,नाणी | नासू नये||

~ संत तुकाराम