गेल्या वर्षी माझं वाचन बरचंस थंडावलं होतं. लग्न झाल्यामुळे पुस्तकी "जीवन" वाचण्यापेक्षा ते प्रत्यक्ष जगण्यात जास्ती वेळ गेला. तरीही काही चांगली इंग्रजी पुस्तकं वाचून झालीच. पण एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे आपण गेल्या २-३ वर्षांत एकही मराठी पुस्तक वाचलेलं नाहीए!
Crossword मध्ये गेलो. तिथल्या मराठी पुस्तक विभागातून तास दोन तास फिरलो, पण एकही पुस्तक घ्यावेसे वाटेना.
परवा एका मित्राशी बोलताना मी ही गोष्ट सांगितली, तर तो म्हणाला, "खरंय! मी पण परवा एका पुस्तक प्रदर्शनाला गेलो होतो, पण नवीन पुस्तकांपैकी एकही आवडलं नाही."
इतर दोघा-तिघांनीही साधारण अश्याच प्रतिक्रिया दिल्या.
असं का व्हावं?
पहिली गोष्ट अशी कि मराठीतली बहुतांश पुस्तकं "स्व" केंद्रीत असतात.. माझा सोमालियाचा प्रवास, माझे स्वादुपिंडाचे ऒपरेशन, माझा मित्र बबन्या, इत्यादी. काही पुस्तके रोचक असली तरी एकुणच हा प्रकार बोअर वाटतो.
दुसरं म्हणजे आपण लोकं फ़ार म्हणजे फ़ारंच भूतकाळात जगतो. मान्य आहे कि रामायण-महाभारत-शिवाजी-पेशवाई हे असे विषय आहेत कि ज्यांच्यावर शेकडोच काय हजारो पुस्तकं लिहीली तरी ती कमीच पडतील. पण म्हणून त्याच-त्याच गोष्टींचं किती चर्वण करायचं?
तिसरा मुद्दा असा कि मराठी लेखकांमध्ये नियमीतपणे उत्कृष्ट लेखन करणारे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच असतील. बाकी लोकं एक तर एक-दोन Bestsellers लिहून गायब होतात, किंवा दर वर्षाला अर्धा डझन सुमार पुस्तकांचा रतीब घालत राहतात. इंग्रजीमध्ये जसं सिडनी शेल्डन, डॆन ब्राऊन किंवा जे. के. रोलींग हमखास हिट ठरणारी पुस्तकं लिहीत जातात, तसं मराठीत सध्या आढळत नाही.
शेवटचा, पण कळीचा मुद्दा असा कि मराठी पुस्तकं फ़ूटपाथवर मिळत नाहीत. ("रस्त्यावर येणं" या प्रकाराचं मराठी माणसाला एकुणंच वावडं आहे!) पुस्तकांच्या किंमती पाहता सर्वच पुस्तकं दुकानातून घेणं परवडत नाही. विशेषत: Fiction (कथा कादंबरी) प्रकारातील पुस्तकं ज्यांचा एकदा वाचून झाल्यावर काहीच उपयोग नसतो.
मला असं अजिबात म्हणायचं नाही कि मराठीत काही चांगलं लेखन होतच नाहीये. कदाचित अनेक उत्तमोत्तम पुस्तकं कदाचित माझ्यापर्यंत पोचतही नसतील. पण वस्तुस्थिती अशी आहे कि तरूण पिढीला आकर्षित करणारे विषय सध्या मराठीत हाताळले जात नाहीत.
काय वाचायला आवडेल?
- अच्युत गोडबोले यांची व्यवस्थापन शास्त्रावरची व संगणक विश्वावरची पुस्तकं मला फ़ारच आवडली होती. या विषयावर पुस्तकं वाचायला नक्कीच आवडेल.
- डॊ. जयंत नारळीकर, डॊ. बाळ फोंडके, निरंजन घाटे यांनी मराठी विज्ञानकथा हा प्रकार अतिशय समर्थपणे हाताळला होता. आता नव्या दमाच्या लेखकांची नितांत गरज आहे.
- स्व-व्यवस्थापन, कामाचं/वेळेचं नियोजन यावर, भारतीय जीवनशैलीला अनुसरून असणारी पुस्तकं मला हवी आहेत.
- शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवणारी एखादी रहस्य-कथा किंवा स्व. जयवंत दळवी, स्व. पु. ल.देशपांडे यांच्या शैलीतला खुसखुशीत विनोद कुठे वाचायला मिळेल?