Monday, July 5, 2010

काय वाचायचं?

माझा असा एक खास कंपू आहे कि ज्यांच्याशी बोलताना एक प्रश्न हमखास येतो, तो म्हणजे: "काय वाचतोयस?" मग प्रत्येकजण आपण काय वाचलं, काय वाचत आहे किंवा काय वाचावसं वाटतंय हे सांगतो. चर्चा वगैरे फ़ार होत नाही पण काही चांगल्या पुस्तकांची नावं समजतात.

गेल्या वर्षी माझं वाचन बरचंस थंडावलं होतं. लग्न झाल्यामुळे पुस्तकी "जीवन" वाचण्यापेक्षा ते प्रत्यक्ष जगण्यात जास्ती वेळ गेला.  तरीही काही चांगली इंग्रजी पुस्तकं वाचून झालीच. पण एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे आपण गेल्या २-३ वर्षांत एकही मराठी पुस्तक वाचलेलं नाहीए!
Crossword मध्ये गेलो. तिथल्या मराठी पुस्तक विभागातून तास दोन तास  फिरलो, पण एकही पुस्तक घ्यावेसे वाटेना. 
परवा एका मित्राशी बोलताना मी ही गोष्ट सांगितली, तर तो म्हणाला, "खरंय! मी पण परवा एका पुस्तक प्रदर्शनाला गेलो होतो, पण नवीन पुस्तकांपैकी एकही आवडलं नाही."

इतर दोघा-तिघांनीही साधारण अश्याच प्रतिक्रिया दिल्या.

असं का व्हावं?

पहिली गोष्ट अशी कि मराठीतली बहुतांश पुस्तकं "स्व" केंद्रीत असतात.. माझा सोमालियाचा प्रवास, माझे स्वादुपिंडाचे ऒपरेशन, माझा मित्र बबन्या, इत्यादी. काही पुस्तके रोचक असली तरी एकुणच हा प्रकार बोअर वाटतो.
दुसरं म्हणजे आपण लोकं फ़ार म्हणजे फ़ारंच भूतकाळात जगतो. मान्य आहे कि रामायण-महाभारत-शिवाजी-पेशवाई हे असे विषय आहेत कि ज्यांच्यावर शेकडोच काय हजारो पुस्तकं लिहीली तरी ती कमीच पडतील. पण म्हणून त्याच-त्याच गोष्टींचं किती चर्वण करायचं?

तिसरा मुद्दा असा कि मराठी लेखकांमध्ये नियमीतपणे उत्कृष्ट लेखन करणारे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच असतील. बाकी लोकं एक तर एक-दोन Bestsellers लिहून गायब होतात, किंवा दर वर्षाला अर्धा डझन सुमार पुस्तकांचा रतीब घालत राहतात. इंग्रजीमध्ये जसं सिडनी शेल्डन, डॆन ब्राऊन किंवा जे. के. रोलींग हमखास हिट ठरणारी पुस्तकं लिहीत जातात, तसं मराठीत सध्या आढळत नाही.

शेवटचा, पण कळीचा मुद्दा असा कि मराठी पुस्तकं फ़ूटपाथवर मिळत नाहीत. ("रस्त्यावर येणं" या प्रकाराचं मराठी माणसाला एकुणंच वावडं आहे!) पुस्तकांच्या किंमती पाहता सर्वच पुस्तकं दुकानातून घेणं परवडत नाही. विशेषत: Fiction (कथा कादंबरी) प्रकारातील पुस्तकं ज्यांचा एकदा वाचून झाल्यावर काहीच उपयोग नसतो.


मला असं अजिबात म्हणायचं नाही कि मराठीत काही चांगलं लेखन होतच नाहीये.   कदाचित अनेक उत्तमोत्तम पुस्तकं कदाचित माझ्यापर्यंत पोचतही नसतील. पण वस्तुस्थिती अशी आहे कि तरूण पिढीला आकर्षित करणारे विषय सध्या मराठीत हाताळले जात नाहीत.

काय वाचायला आवडेल?
  • अच्युत गोडबोले यांची व्यवस्थापन शास्त्रावरची व संगणक विश्वावरची पुस्तकं मला फ़ारच आवडली होती. या विषयावर पुस्तकं वाचायला नक्कीच आवडेल.
  • डॊ. जयंत नारळीकर, डॊ. बाळ फोंडके, निरंजन घाटे यांनी मराठी विज्ञानकथा हा प्रकार अतिशय समर्थपणे हाताळला होता. आता नव्या दमाच्या लेखकांची नितांत गरज आहे.
  • स्व-व्यवस्थापन, कामाचं/वेळेचं नियोजन यावर, भारतीय जीवनशैलीला अनुसरून असणारी पुस्तकं मला हवी आहेत.
  • शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवणारी एखादी रहस्य-कथा किंवा स्व. जयवंत दळवी, स्व. पु. ल.देशपांडे यांच्या शैलीतला खुसखुशीत विनोद कुठे वाचायला मिळेल?

Tuesday, May 11, 2010

पुणेरी पाट्या

पुण्यातील इरसाल पाट्या हा पुणेकरांसाठी अभिमानाचा विषय आहे. आम्ही (च्यामारी! पुण्याबद्दल नुस्तं लिहायला लागलो तरी "मी" चा "आम्ही" होऊन जातो!) पुण्यात संगणक भाषा शिकत असता (पक्षी: डेक्कन जिमखाना, क्याम्प वगैरे प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत असता) अश्या अनेक पाट्या आमच्या नजरेस पडल्या, तर काही ई-मेल मध्ये वाचायला मिळाल्या. 
काही नमुने आपल्यासाठी पेश करत आहे...

  • कृपया वस्तू ऊधार मागू नये. अपमान होईल.
  • दारावरील बेल फ़क्त एकदाच वाजवावी. विजेचे बिल आम्ही भरतो.
  • तीनदा बेल वाजवूनही दरवाजा न उघडल्यास समजावे कि आम्हांस आपणास भेटावयाचे नाही.
  • आम्ही शाकाहारी आहोत, पण आमचा कुत्रा शाकाहारी नाही.
  • इथे मुत्रविसर्जन करू नये. केल्यास कायमचा ईलाज केला जाईल.
  • इथे कम्प्युटर सीडीज, फ़्लॊपीज व स्वस्त दरात नारळ मिळतील.
  • इथे हापूस आंबे, कोकम सरबत व परकर मिळतील.
  • गिर्हाईक हा राजा असतो. राजा कधीही ऊधार मागत नाही.
  • मस्तानी पार्सल करून मिळेल.
  • मंदिरात जास्त वेळ बसू नये. तुम्ही रिकामटेकडे असाल, पण ही बाग नाही.
  • शांतता राखा. थुंकू नका. माणसासारखे वागा.
  • सेल्समनांस सुचना: सदर इमारतीत विक्री न झाल्यास सोसायटी जबाबदार नाही.
  • सोसायटीच्या सभासदांशिवाय अन्य अवजड वाहनांस प्रवेश वर्ज्य.
  • इथे जोशी रहात नाहीत. पुन्हा पुन्हा विचारू नये.
    (व त्याच घरासमोरील पाटी): जोशी इथे रहातात. इकडे-तिकडे विचारू नये.
  • फ़ाटकावरील आतील बाजूची पाटी: बाहेर जाताना फ़ाटक बंद न केल्यास पुन्हा आत घेतले जाणार नाही.
  • बंगला रिकामा आहे. आत चोरण्यासारखे काहिही नाही. विनाकारण कष्ट घेऊ नये.
  • येथे चोरी करणारा नेहमी पकडला जातो. याची कृपया नोंद घ्यावी.
  • भिकारी लोकांस सुचना: कुत्रे व भुतांपासून सावध रहा.
  • सेल्समननी आत येऊ नये. सेल्सगर्ल आत आल्यास मालक जबाबदार नाही.
  • पत्ता सांगायचे ५ रूपये पडतील. हे असे का लिहीले आहे हे सांगायचे १० रूपये पडतील.
  • पोष्टमनास सुचना: कृपया पत्रें या खिडकीतून आत टाकू नयेत. आमटीत पडतात, चव बिघडते.
  • आजचे ताजे पदार्थ: भजी व मिसळ. मुळव्याधीचे औषध मिळेल.
  • आम्ही ऊपवासाचे पदार्थ वेगळ्या तव्यावर करतो.
  • लाईट गेल्यास कॆण्डल-लाईट डिनरचा वेगळा चार्ज पडेल.
  • वेटरला टिप देऊ नये. आम्ही त्यांना पुरेसा पगार देतो.
  • बाहेरील पदार्थ आत आणू नयेत. आतील पदार्थ बाहेर नेऊन खाल्ले तर चालेल.
  • कृपया चूळ भरताना घाणेरडे आवाज काढू नयेत. 
  • आपल्यामुळे इतरांना त्रास झाला तर इतरांमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो.
  • ए नाही अहो रिक्षावाले म्हणा.
  • रिक्षात तंबाखु, गुटखा खाऊन बसू नये व बसून खाऊ नये.
  • अनोळखी वस्तू किंवा व्यक्तींस स्पर्श करू नये.
  • गाडीवरील धुळीत लिहिलेले वाक्य: आता तरी पुसा!
  • गॆरेज: इथे अपली वाहणे कालजीपूवक दुरुस्ती करूण मिलेल
  • इथे अर्जंट शेवया करून व ब्लाऊज शिवून मिळेल.
  • येथे लघवी करू नये. वरून लोकं पहातात.
  • "दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्र": डेअरी!
  • "दंतोपचार, दंत दुरूस्ती व दंतौषधी विक्री केन्द्र" : डेन्टल क्लिनीक!

Monday, May 10, 2010

समज - गैरसमज

रोजच्या जगण्यात (साहित्तिक भाषेत लिवायचं म्हंजी ’दैनंदिन जीवनात’) आपण अनेक रुढी-प्रथांना कवटाळून रहातो. त्यापैकी काही प्रथांची तार्किक कारणं सांगू शकतो, तर काही प्रथा अनाकलनीय वाटतात.
या लेखात मी अशाच काही समज-गैरसमजांचा संग्रह करणार आहे.

समज -गैरसमज...


  • साय़ंकाळी दिवा लावल्यावर हात-पाय धुवू नयेत, तसेच केर-कचरा काढू नये.
    पुर्वी दिवेलागणीच्या वेळेला परवचा-पाढे म्हणत. या प्रथेमुळे मुले-बाळे मोठी माणसं आपोआप घरी लवकर परतत. सर्वजण मिळून स्तोत्रे म्हणत, एकत्र जेवण करत. तसेच आधी tubelights वगैरे नसल्यामुळे केर वगैरे काढला तर घरातील काही महत्त्वाची वस्तू बाहेर जाण्याची शक्यता असायची.
    आजच्या काळात हे सर्व शक्य नसले तरी या प्रथेचे स्पष्टीकरण देता येते.

  • मांजर आडवं गेलं तर काम होत नाही. मांजरांनी काय गुनाव केला वो? कुत्र्या-मांजरांसारख्या निष्पाप प्राण्यांपेक्षा (काही) माणसं आडवी गेली तर तो अपशकून ठरतो.  

  • शुक्रवारी पैसे देऊ नयेत, द्यायचेच असतील तर मंगळवारी द्यावेत. शुक्रवार देवीचा (लक्ष्मीचा) वार, म्हणून पैसे देऊ नयेत हे पटण्याजोगे आहे; पण मंगळवारी पैसे का द्यावेत हे माहीत नाय बा...

  • एखाद्याला बाहेर जाताना ’कुठे जातोस" असे विचारू नये, त्याने काम होत नाही. साक्षात समर्थ उत्तम लक्षण सांगताना लिहून गेलेत की "जाणारास पुसो नये कोठे जातोस म्हणोनी". एकदम बरोबर... अनेकदा आपल्याला सांगायचं नसतं. मग चिडचिड होते, काही तरी थातूरमातूर कारणं द्यावी/ऐकावी लागतात. त्यापेक्षा न विचारलेलं बरं! 

  • एखाद्याला घरी यायला ऊशीर होत असेल तर, दाराला पळी (संध्येत वापरतात ती, आमटीत बुडवतात ती नव्हे ) अडकवावी, म्हणजे माणूस लवकर घरी परत येतं. असं एक-दोनदा झालंय... म्हणजे होतं कसं की फ़ारच वाट पहायला लागली की शेवटी वैतागून आपण पळी अडकवायला आणि दाराची बेल वाजयला एकच गाठ पडते. पण हा निव्वळ योगायोग असावा.

  • केळं अर्धवट खाऊन टाकू नये; तसंच दहीभात पानात टाकू नये. कारण केळ्याला ब्रह्मफ़ळ मानतात व दहीभाताला पुर्णान्न... काही ठावकी नाय बुवा, पण केळं काय किंवा दहीभात काय, पानात काहीच टाकू नये हे बरं!

  • गणेश चतुर्थीला चंद्र पाहील्यास चोरीचा आळ येतो... जसा श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला होता (बाकी, कृष्णदेवांवर कोणता आळ यायचा बाकी होता!).
    पण लहानपणी रात्री घरोघरच्या धुपारत्या आटपून पायवाटेने येत असता चंद्राचाच प्रकाश कामी यायचा आणि हटकून नजर जायची! तेव्हा, ही फ़क्त एक पुराणकथाच असावी.

  • खिडकीबाहेर कावळा ओरडला की घरी पाहुणे येतात... धादांत असत्य! कावळा ओरडो अथवा न ओरडो, पाहुणे लोक यायचे तेव्हाच येतात (आणि त्यांना जायचे तेव्हाच जातात).

  • मुंगूसाचे दर्शन शुभ असते... मी रहातो तिथे अनेकदा मुंगूस दिसते. त्या दिवशी विशेष असं काही घडल्याचं स्मरत नाही (हां, कधी कधी टिफ़ीनमध्ये बटाटयाची भाजी निघते हे खरंय!), तरी मुंगूसाची ती झुपकेदार शेपटी बघण्यातही आनंद असतो.




... आणि काही यक्ष-प्रश्न!
दैनंदिन जीवनात (च्यामारी!) काही प्रश्न असे असतात, जरा ऊवांसारखे...  म्हटलं तर क्षुल्लक, म्हटलं तर डोकं खाजवायला लावणारे.  त्यांचा (प्रश्नांचा.. ऊवांचा नव्हे!)  समावेश मी या भागात करणार आहे. (अर्थात या शंका-कुशंकाना यक्ष-प्रश्न वगैरे म्हणणे म्हणजे, बाभुळगावच्या बबन्याने स्वत:ला बिल गेट्स समजण्यासारखेच आहे... पण ते एक असो!)


  • माणसं मंदिरात प्रदक्षिणा काढताना, देवाच्या मागं जाऊन डोकं का बरं टेकवतात? असं डोकं टेकवत राहिल्याने तिथे खोलगट भाग तयार होतो, डोस्क्यांचं तेल लागून जागा ओलसर होते, आणि मग माणसं तिथे नाणी चिकटवतात!

  •  माणसं जांभई देताना चुटक्या का वाजवतात? माश्या वगैरे तोंडात जाऊ नये म्हणावं तर इतर वेळी हीच लोकं तोंड मोकळं सोडून बोलत असतात.

[ समज-गैरसमज आणि प्रश्न... संपलेले नाहीत! जसजसे आठवत जातील तसतसे लिहीत जाईन..]

Tuesday, May 4, 2010

मुलं आणि मारामारी

काही दिवसांपुर्वीची गोष्ट... रस्त्याने चाललो होतो. बाजूनं काही शाळकरी मुलं जात होती. त्यातील दोघांची नुकतीच मारामारी झाली असावी, कारण कपडे मातीने माखलेले होते, हाता-पायांवर खरचटल्याच्या खुणा ठळक दिसत होत्या. महत्त्वाचे म्हणजे रस्त्याने जाताना पण त्यांची जोरजोरात बाचाबाची चालू होती. विषय अर्थातच IPL मधील Mumbai Indians चा पराभव व सचिन तेंडुलकरची कर्णधार म्हणून क्षमता. आता, सचिन तेंडुलकरचा विषय निघाला कि थोर-थोर लोक सुद्धा हमरी तुमरीवर येतात, तिथे पोरांमध्ये मारामारी व्हावी यात नवल नव्हते.

शाळेत असताना मारामारी हा रोजच्या विषयांपैकी एक असावा असे वाटण्य़ाइतपत परिस्थिती होती. माझे काही परम-मित्र तर शिकण्यापेक्षा भांडायलाच शाळेत येत असावेत. भांडायला कारण काही लागायचे नाही. तुला माझ्यापेक्षा जास्त मार्क का मिळाले, इथपासून ते, तू माझ्याकडे रोखून का पाहिलेस, या पैकी कशावरूनही युद्ध पेटायचे.




सुरवात साधारणपणे आम्ही प्रार्थना (Assembly) संपवून वर्गात परतत असताना धक्कबुक्की करणे, In केलेला शर्ट बाहेर ओढून काढणे इथून करत. मग दिवसभर वर्गात कागदी बोळे फ़ेकून मारणे, पेन्सिलीचे टोक मोडणे, Camlin च्या पट्ट्या (Ruler) मोडणे असा गनिमी कावा चालून शेवटी सांगता  शाळेच्या क्रीडांगणावर वर्ग-बंधूंच्या ( आणि काही भगिनींच्या) साक्षीने तुफ़ान हाणामारीने व्हायची. एकमेकांना (आणि काही बघ्यांना) व्यवस्थित चोप दिल्यावर भिडू "आजचा दिवस सत्कारणी लागला" या समाधानात आप-आपल्या घरी जात.




काही येरूंच्या तोंडी मात्र "हात लावलास तर याद राख" "उद्या बघून घेईन" अशी - केवळ भारताच्या संरक्षण-मंत्र्यांच्या तोंडीच शोभणारी - भाषा असायची; तर काही शूरवीर "बाबांना नाव सांगीन" "टिचरला कंप्लेन करीन" वगैरे धमक्या द्यायचे. यदाकदाचित हे लोक पुढे भारताचे पंतप्रधान वगैरे झालेच तर "अमेरिकेला नाव सांगीन हं" वगैरे बाता करायला त्यांना हा अनुभव कामी येईल. असो!

आजकाल भांडण करणे, हा प्रकार मुलांमध्ये थोडा कमीच होत चालला आहे असे वाटते. कारण आई-बाप (म्हणजे पालक लोक) "जागरूक" झाले आहेत. पोराला कोणी बोट जरी लावले असेल तरी पहिला फोन त्या "गुंड" मुलाच्या घरी जातो, आणि दुसरा शाळेच्या प्रिन्सिपलना. इकडे मुलं आपलं भांडण विसरून मजेत खेळत असतात अन तिकडे दोन्ही पालक एकमेकांची ऊणीदुणी काढत रहातात.


मला स्वत:ला मारामारी न करणारे बालक, आणि मारामारी करणारे पालक.. दोन्ही पण मुळीच आवडत नाहीत!

Monday, July 14, 2008

पांडुरंग वरदा...

आज आषाढी एकादशी. महाराष्ट्राच्या कानाकोपयातून हजारो भाविक शेकडो मैलांचे अंतर पायी तुडवून पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. देहू-आळंदीहून तुकाराम - ज्ञानेश्वर यांच्या पालख्या त्यांच्या लाडक्या विठूरायाला ऊराऊरी भेटतात.


लहानपणी मी बाबांना विचारले होते, " ही एवढी लोकं चालत-चालत का जातात? बस किंवा रेल्वेनं का नाही जात?" बाबांकडे या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर नव्हतं. आज जर मला हाच प्रश्न कोणी विचारला तर माझ्याकडेही नाही. पण एवढं मात्र खरं की सिंहगड चढून जाऊन घामाघूम होऊन हिरवळीवर बसण्यात जी मजा आहे ती बाईकनं १५ मिनीटांत पोचण्यात नाही!

कोल्हापूरची महालक्ष्मी, प्रभादेवीचा सिध्दिविनायक व पंढरपूरचा विठोबा, ही महाराष्ट्राची प्रमुख आराध्य दैवतं... मी कोल्हापूरला तीन-चारदा जाऊन आलोय, मागील वर्षी सिध्दिविनायकाच्या दर्शनाचा योग आला; पण पंढरपूरला जाण्याचा योग काही जुळून येत नाही (तसेच शिर्डीला जाण्याचा). बहुदा गाठीशी आवश्यक तेवढे पुण्य नसेल तर देवही जवळ करीत नसावा!


आज दिवसभराच्या ऊपवासाने प्राण कंठाशी आले असताना "महाराष्ट्र टाईम्स" मध्ये ही बातमी वाचली, आणि वाटले, वा! "पांडुरंग दाता, पांडुरंग त्राता, अंतीचा नियंता, पांडुरंग..."

*******

म.टा. : केरसूणी विकून उदरनिर्वाह करणाया ७६ वर्षे वयाच्या सोनाबाई फाळके यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी १ लाख रूपये जमवले होते, परंतु दुर्दैवानं त्यांच्या मुलीचे अपघाती निधन झाले. विठ्ठलालाच आपलं लेकरू मानून या माऊलीनं हे सारे पैसे दान केले आणि आपले घर गाठले.

Wednesday, May 7, 2008

स्वामी



"स्वामी" ही थोरल्या माधवराव पेशव्यांची जीवनगाथा. लेखक रणजित देसाई यांची पहिलीच ऐतिहासिक कादंबरी. यानंतर त्यांनी "राधेय" (कर्ण), "श्रीमान योगी" (शिवाजी महाराज) यांसारख्या उत्तमोत्तम कादंबया लिहिल्या, पण जनमानसात त्यांची ओळख निर्माण झाली ते "स्वामी"कार म्हणूनच!

विलक्षण घटना-प्रसंग, विपुल व ताकदवान संवाद, अचूक शब्दयोजना, हा या कादंबरीचा आत्मा आहे. या दृष्टीने "स्वामी" ने ऐतिहासिक कादंबयात नवा प्रवाह निर्माण केला असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.

रमाबाई व माधवराव यांच्यामधील भावपूर्ण प्रसंगांनी तर मराठी वाचकाला अक्षरश: वेड लावलेय. शृंगार हा संयमितपणे चित्रीत करूनही तो कसा मनोवेधक ठरू शकतो हे देसाईंनी दाखवून दिले. "स्वामी" मूळे रमा-माधव ही जोडी अजरामर, आदर्श जोडप्यांच्या यादीत कायमची विराजमान झाली आहे.

माधवरावांचा करारीपणा, त्यांची कर्तव्यनिष्ठा, दूरदृष्टी, गणेशभक्ती; रमाबाईंचा भावूक स्वभाव व पतिवरील निर्लेप प्रेम; राघोबादादांचा सत्तेवरील मोह, त्यासाठी प्रसंगी स्वजनांचा घात करण्याची त्यांची वृत्ती, मराठी राजकारणातील डावपेच, उतार-चढाव यांचे एक अनोखे दर्शन या कादंबरीत आपल्याला होते. रमा-माधवरावांबरोबरच नाना फडणीस, राघोबादादा, रामशास्त्री, सखारामबापू, हैदर-अल्ली, निजाम आदी व्यक्तिविशेषांचे जीवनपट उलगडले जातात.

ऐतिहासिक कादंबयांच्या प्रत्येक संग्रहात "स्वामी"ची उपस्थिती अत्त्यावश्यक आहे!

१४ नोव्हेंबर २०००

Monday, May 5, 2008

मागं वळून पहाताना...


कालचीच गोष्ट...
पाच-सहा मित्र लायब्ररीत बसलो होतो. अभ्यासापेक्षा चेष्टा-मस्करीच जास्त चालली होती. बोलण्याच्या ओघात एकानं सहज म्हटलं, " Send-off २८ फेब्रुवारीक जातलो अशें दिसता.." क्षणार्धात सगळा मूड खराब झाला. मी काही तसा पट्कन भावनावश वगैरे होणारा प्राणी नाही, पण मलाही कुठंतरी आत खोलवर अपार खिन्नता दाटून आल्यासारखं वाटलं.

कॊलेजमध्ये एडमिशन घेतली त्याला आज ९४८ दिवस झाले (गोकाककर सरांच्या हाताखाली वर्षभर Analytical Chemistry शिकल्याने बोलण्या-लिहिण्यात एवढी अचूकता येणं स्वाभाविक आहे!) पण ती घटना अगदी काल-परवा घडल्यासारखी वाटते. खरं तर मी येणं हा एक योगायोगच होता. बारावीनंतर मी एका नामांकित कॊलेजमध्ये BCA साठी प्रवेश घेतला होता, पण जुनाट अभ्यासक्रम व शिक्षकांची बेपर्वा वृत्ती यामुळे वैतागून मी त्याला लवकरच राम-राम ठोकला.
पुढं काय करायचं या विवंचनेत असताना पी.ई.एस. मधील Industrial Chemistry या अभ्यासक्रमाबद्दल कळलं; बारावीत असताना रसायनशास्त्राची गोडी लागलीच होती. वाटलं, यात आपण काहीतरी करू शकू. अशा तर्र्हेने स्वारी पी.ई.एस.कोलेजमध्ये दाखल झाली.गेल्या दोन-अडीच वर्षांत मला एकदाही या निर्णयाचा पश्चात्ताप झाला नाही हे मला इथं आवर्जून नमूद करावंसं वाटतं.

सुरवात जरा कठीण गेली. माझा स्वभाव बराचसा एकलकोंडा, आपल्याच कोषात गुरफटून रहाण्याचा. मी कोलेजमध्ये गूपचूप यायचो, लेक्चर्सना बसायचो, आणि नंतर सरळ घरी यायचो. मैत्री तर सोडाच कुणाशी साधी तोंडओळखपण झाली नव्हती.
पण लवकरच आमचा मस्त ग्रुप जमला. प्रत्येकाचे स्वत:विषयी अनेक गैरसमज. युवराजला वाटायचं की आपला आवाज जगजितसिंग सारखा असून यच्चयावत मूली आपल्यावर फिदा आहेत. विशालला आपण सर्वशक्तीमान असल्याचा भास व्हायचा. सम्राट इंटरनेटच्या महाजालात गुरफटलेला, तर ब्रिजेश आपल्या कम्प्युटरवरील mp3 गाण्यांची संख्या वाढवायच्या मागे लागलेला. क्रिकेट series सुरू असली की उल्हासला प्रोफेसरांच्या जागी सचिन सौरव दिसायचे. एकही लेक्चर न चुकविण्याचा गंधालीचा अट्टाहास तर रश्मी एक दिवस आली की चार दिवस गायब. एक सच्चा मित्र या नात्याने मी या सर्वानां कायम जमिनीवर आणण्याच्या प्रयत्नात असे.

आम्ही सर्वजण मोकळ्या मनाचे, आणि त्याहून मोकळ्या तोंडाचे; त्यामुळे रोज विशाल x मदन, युवराज x सागर, रश्मी x गंधाली अशा चकमकी चालू असत. मला आणि सागरला तर दिवसातून एकदा तरी कडाक्याचे भांडण झाल्याशिवाय वडा-पाव घशाखाली उतरत नसे.
पुढे मागे मी एखादा शब्दकोश वगैरे लिहिलाच तर त्यात "अष्टपैलू" याला समानार्थी शब्द "आत्माराम" देईन. रिचर्ड कायम मूलींच्या मागे. कधी-कधी मात्र रिची पुढे आणि त्याला बदडायला मूली त्याच्यामागे असंही चित्र पहायला मिळायचं.

माझी मुलींशी ओळख बरीच ऊशीरा झाली आणि (सुदैवाने असो अथवा दुर्दैवाने) ती निव्वळ मैत्रीपुरतीच मर्यादित राहिली. त्यामुळे हा भारत देश (अजून एका !) अजरामर प्रेम-कहाणीला कायमचा मुकला.

या सर्व मित्रांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. लेक्चर्स बुडवून कॆन्टीनमध्ये बसणे, लायब्ररीमध्ये शांत वातावरण चुकूनही रहाणार नाही याकडे जातीनं लक्ष देणे, यासारख्या अनेक गोष्टी मी त्यांच्याकडूनच शिकलो. खरोखर, आज मी जो काही आहे, तो माझ्या या मित्रांमुळेच; ते मला भेटले नसते तर... तर मी नक्कीच कोणीतरी चांगला आणि मोठा माणूस बनलो असतो.

आमची प्रेक्टीकल्स म्हणजे अक्षरश: समरप्रसंग असे. कुठे Sodium fusion tubes फुटताहेत, कुठे धूराचे लोट ऊठताहेत, कुणाच्या एप्रनवर concentrated acid सांडतय, तर कुणाच्या तोंडात Strong alkali जातेय अशा धुमशचक्रीत आमचा chemical analysis चालायचा. तिसया वर्षाच्या प्रकल्पासाठी तर आम्ही TNT (एक अतिस्फोटक रसायन) बनवायचा घाट घातला होता, परंतु तो हाणून पाडण्यात आला.

पी.ई. एस. कॊलेज ही जर एक कंपनी मानली तर या कंपनीचे प्रमुख assets आहे इथला उत्कृष्ट शिक्षकवर्ग आणि सेवाभावी वृत्तीनं काम करणारा कर्मचारीवर्ग. गणित शिकविणाया सामंतबाईंच्या करड्या नजरेचा सुरूवातीला प्रचंड धाक वाटायचा, पण Group Theory व Operations Research सारखे क्लिष्ट विषय त्यांनी इतक्या रंजक रितीने समजावले कि त्यांच्याबद्दल आवड कधी निर्माण झाली ते माझं मला कळलं नाही. कुलकर्णी सर आम्हाला बरोबरच्या मित्रांप्रमाणे वागवत, त्यांच्या कोल्हापूरी पायतणांचा जसा चर्र चर्र आवाज यायचा तसा मी नंतर कुठेच पुन्हा ऐकला नाही.

पी.ई. एस. कॊलेजनं मला काय दिलं याचं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं तर मी म्हणेन - माझा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवून दिला! प्रथम वर्षात असताना मी कॊलेजचं मासिक "आदित्य" साठी एक छोटासा लेख लिहीला होता. आमचे प्रिन्सिपल डिंगे सरांनी आपल्या केबिनमध्ये मुद्दाम बोलावून त्याबद्दल शाबासकी दिली होती. विमनस्क मनस्थितीत पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने मनाला ऊभारी आली, आपण पुन्हा झेप घेऊ शकतो ही जाणीव निर्माण झाली.
गेली तीन वर्षं आम्ही शिक्षकांच्या छत्रछायेखाली, मित्रांच्या सहवासात एक प्रकारच्या सुरक्षित वातावरणात काढली. आता यापुढची वाटचाल एकट्याने करावी लागणार या विचाराने अस्वथ व्हायला होतं. इंटरनेट, मोबाईलमुळे संपर्कव्यवस्थेत क्रांती झाली असली तरी आपली माणसं एकदा दूर गेली की पुन्हा भेटतातच असं नाही, आणि भेटली तरी पुर्वीची ती ओढ कायम रहातेच असं नाही. आज कायम contact मध्ये रहाण्याच्या शपथा घेणारे आम्ही, सहा महिन्यांतच कुठे कुठे विखुरलेले असू हे आमचं आम्हालाच माहित नाही.

असो... माझी एवढीच सदिच्छा आहे कि आमच्या batch मधला प्रत्येकजण आप-आपल्या क्षेत्रात फार पुढे जावा. मला मान वर करून सांगता आलं पाहिजे की, " तो माझा मित्र आहे, आणि पी.ई. एस. कॊलेजमध्ये आम्ही एकमेकांबरोबरच लेक्चर्स बुडवली आहेत!"

("आदित्य" - २००४)